.
२५ डिसेंबर ह्या दिवशी सर्व जगभर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणजेच ज्याला ख्रिसमस असे म्हटले जाते, तो अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. त्या विषयी आज आपण काही अत्यंत महत्त्वाच्या बाबी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बायबल ह्या धार्मिक ग्रंथात मानवाची उत्पत्ती आणि त्याच्या पतनां विषयी आपण वाचतो. आदाम व हव्वा ह्यांच्या आज्ञाभंगा मुळे संपुर्ण मानवजात ही पापाच्या अधीन झाली. प्रत्येक मानव हा त्यामुळे पाप व अधर्म ह्यांच्या गुलामगिरीत ओढला गेला. आज देखील प्रत्येक मानव हा जन्मतःच पापाचा गुलाम आहे. मानवाच्या पातकामुळे परमेश्वर व मानव ह्यांच्यामध्ये पापाची एक मोठी आणि न भेदता येणारी भिंत उभी राहिली. त्यामुळे प्रभु येशुवर अंतःकरणाने प्रीती करा मगच प्रभू तुमच्या अंतःकरणाचे दार ठोकणार आहे.
बायबलच्या पहिल्या भागात ज्याला जुना करार म्हटले जाते, त्यात परमेश्वर देवाने मानवजातीच्या मोक्षासाठी किंवा मुक्तिसाठी देवाचा पुत्र हा एक मानवी जन्म घेणार आहे, असे अनेकदा सांगितले होते. परमेश्वराने त्याच्या मानवजातीवर असलेल्या प्रीतिमुळे आपला एकुलता एक पुत्र जगात मानव म्हणून पाठविला. या साठी की मानवजातीचा उद्धार व्हावा आणि त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पहिल्या शतकात यहुदी लोक हे रोमन शासकांच्या क्रुर, जुलमी राजवटीमध्ये आपले जीवन जगत होते. म्हणून ते नेहमी येणार्या मसिहाची वाट पहात होते.
त्या स्वर्गिय योजनेची परिपुर्तता होण्यासाठी मरिया या कुमारीची निवड केली गेली. पवित्र आत्म्याच्या व्दारे योसेफाशी वाग्दान झालेल्या कुमारी मरियेच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्त हा जन्माला आला. त्या आधी देवाने त्याच्या स्वर्गदुताला पाठवून मरियेची भेट घेऊन, तीला या विषयी आगाऊ सांगितले होते. त्या देवदुताला ती म्हणाली की, हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही ? त्यावर तो देवदुत तीला म्हणाला की, “पवित्र आत्मा तुजवर येईल आणि परात्पराची शक्ती तुजवर छाया करील; या करिता, जो जन्मेल त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे म्हणतील”. (लुककृत शुभवर्तमान १:३५) त्यावेळी मरिया ही तीच्या लग्ना आधी आपल्या घरी राहात होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा विषयी सुमारे सहाशे वर्षे आधी असे सांगितले गेले होते की, ” कारण आम्हांसाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील ; त्याला अदभुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता व शांतीचा अधिपती म्हणतील”. (यशया ९:६)
प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यावर अनेक देवदूत हे आकाशात अवतरले व ते प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदात सहभागी झाले. त्या काळात मेंढपाळ आपल्या मेंढरे चारीत असताना देवाचा देवदुत त्याच्या जवळ येउन उभा राहिला व प्रभू येशूच्या जन्माची ही चांगली शुभवार्ता त्यांना सांगितली. तसेच आकाशातील एका ताऱ्याने तीन ज्ञानी लोकांना जे पुर्वेकडुन आले होते, त्यांना बाळ येशूच्या गव्हाणी जवळ येण्यासाठी मार्गदर्शन केले. एक राजा जन्मला आहे हे त्यांना समजले होते. ज्ञानी व साध्या मेंढपाळांना देखील ही सुवार्ता कोणत्याही भेदभावा शिवाय सांगितली गेली. कारण देव हा सर्वांवर सारखी प्रीति करणारा आहे.
प्रभु येशु ख्रिस्त ह्या जगात राहताना, तो पुर्ण मनुष्य होता व तो पुर्ण देव होता. तो ह्या पृथ्वीवर एक पवित्र जीवन जगला, देवाचा दैवी किंवा ईश्वरी स्वभावाची ओळख त्याच्या व्दारे आपल्याला होते. ज्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले त्यांना क्षमा करण्यासाठी त्याने देव पित्याला विनंती केली. आपल्या भुकेल्या शत्रुला अन्न व पाणी देण्याची शिकवण त्याने आपल्या शिष्यांना दिली. त्याने अनेक चमत्कार केले व काही मेलेल्यांना देखील त्याने जिवंत केले.
तो ईश्वरी योजने प्रमाणे वधस्तंभावरचे दुःख सहन करुन शेवटी मरण पावला. पण त्याने आधी सांगितल्याप्रमाणे तो तीसऱ्या दिवशी जिवंत होऊन ह्या पृथ्वीवर सुमारे चाळीस दिवस राहीला व पुन्हा स्वर्गात गेला.
मानवाला पापाच्या गुलामगिरी मधून प्रभू येशू ख्रिस्त हा मुक्त करुन, त्याला मोक्ष किंवा पापां पासून सुटका देऊ शकतो. आज जग हे अनिती, दूराचार, अन्याय, भ्रष्टाचार ह्यांनी भरलेले आहे. आज जर एक व्यक्ती प्रभु येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवते व आपली पातके व अपराध कबूल करुन, त्याला क्षमा मागते तर प्रभु येशू ख्रिस्त त्याला त्याच्या पापांची क्षमा करतो.
तो मार्ग, सत्य व जीवन आहे.
प्रभु येशू ख्रिस्त हा आज देखील जिवंत आहे व तो आपल्या अंतःकरणाचे दार ठोकत आहे. जर आपण त्याच्यासाठी आपल्या ह्रदयाचे व्दार उघडले, तर तो आज आपल्या ह्रदयात राहील. मग आपल्याला खऱ्याखुऱ्या ख्रिसमसचा अनुभव आल्या शिवाय राहणार नाही. आपले जीवन हे शांती, प्रीति व आनंदाने भरुन टाकणारा हा एक स्वर्गीय अनुभव आहे.
म्हणूनच…..
सर्व वाचकवर्गाला ख्रिस्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
सुशील राज राठोड
मा. सेक्रेटरी,
चर्च ऑफ ख्राईस्ट, बारामती
9923216295