फलटण टुडे (सातारा दि. 19 ): –
लोकसभा निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात होण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आणि निवडणूक विषयक प्रशिक्षण महत्वाचे आहे; त्यादृष्टीने आत्तापासूनच तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी रोहयो विजया यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, लोकसभा निवडणूकीसाठी लागणाऱ्या विविध साहित्याची यादी (चेकलिस्ट) तयार तयार करुन टप्प्याटप्प्याने साहित्य मागवावे. वाहनांचीही मोठी आवश्यकता भासणार पाहता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदी असलेल्या सुस्थितीतील वाहने अधिग्रहीत करावी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडील नादुरुस्त वाहनेही दुरुस्त करुन वापरता येतील, असेही ते म्हणाले.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे जनजागृती करावी. यासाठी खासगी संस्थांची मदत घ्यावी. त्यासाठी निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल. निवडणूकीसाठी लागणारे मनुष्यबळ वेळेत उपलब्ध करुन घ्यावे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही त्यादृष्टीने पोलीस विभागाने आत्तापासूनच कारवाईला करण्यास सुरुवात करावी. अवैध मद्य प्रकरणांमध्ये कडक कारवाई करावी. निवडणूक काळात याबाबत जागरुकता राहून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदान केंद्रे हे जास्त करुन विविश शाळा, महाविद्यालयांमध्ये आहेत. ही मतदान केंद्रे सुस्थितीत आहेत याची तपासणी करावी. सुस्थितीत नसलेल्या केंद्रांच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने दुरुस्ती काम करावे. त्याचबरोबर मतदारांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
निवडणूक विषयक भारत निवडणूक आयोगाच्या नियमपुस्तिकांचे बारकाईने वाचन करुन काटेकोर त्यानुसार कामकाज करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.