फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –
राज्यातील विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी या नोडस एजन्सी मार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रम हा केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून संस्थास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अशा तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व तांत्रिक, अतांत्रिक महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी प्रचार प्रसार व विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन करणे, दुसऱ्या टप्यात जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा व तिसऱ्या टप्यात राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट १० नवकल्पना निवडणे असा आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हयातील एकूण 63 शैक्षणिक संस्थांनी तर एकूण 207 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संस्थास्तरावरती विजेत्या ठरलेल्या 32 नवकल्पना धारक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा गुरुवार दि. 7 डिसेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे पार पडली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ए. सी. अत्तार, प्राचार्य, शबीना मोदी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी सातारा जिल्हयातून एकूण 32 उमेदवार पात्र होते त्यापैकी 24 उमेदवार प्रत्यक्ष हजर होते, विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ परीक्षकांनी प्रत्येक उमेदवारांच्या नव कल्पनांचे परीक्षण करुन अंतिम गुण ऑनलाइन निश्चित केले. जिल्हास्तरीय पहिल्या सर्वोत्कृष्ट 10 विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बीज भांडवल तसेच तिसऱ्या टप्प्यात राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट 10 विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बीज भांडवल व इन्कूबेशन कार्यक्रमाबाबत माहिती श्री. पवार यांनी यावेळी दिली.