फलटण टुडे (प्रतिनिधी ) : –
भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशा सुमारे २,१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेचे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजभवन मध्ये स्वागत केले . यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत आनंद सोहळा साजरा केला .
भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी घुमान ( पंजाब ) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली असून शांती, समता, बंधुता या संत विचारांचा प्रचार-प्रसार करीत महाराष्ट्र , मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश , दिल्ली व हरियाणा राज्याचा प्रवास करीत ही यात्रा शनिवारी पंजाब राज्याची राजधानी चंदिगड येथे पोहोचली .
राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी यात्रेचे स्वागत केले . ते म्हणाले , भारतीय संस्कृती जतन करण्याचे व जोपासण्याचे काम तुम्ही करीत आहात . नव्या पिढीला संतांचे विचार देवून तुम्ही त्यांना प्रवृत्त करीत आहात . तुमची ही निस्वार्थ सेवा आहे . भागवत धर्माचा प्रचार व प्रसार हे मोठे काम आहे आणि ती काळाची गरज आहे . ही यात्रा देश जोडण्यासाठी उपयुक्त आहे . ते तुम्ही करीत आहात ही अभिमानाची बाब आहे .
या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत . या स्वागत समारंभास भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, खजिनदार मनोज मांढरे , दत्तात्रय पवार , चंद्रकला भिसे , नामदेव दरबार कमिटीचे सरपंच नरिन्द्र सिंह निंदी ,
अध्यक्ष तरसेम सिंह बावा ,
महासचिव सुखजिन्द्र सिंह बावा ,
उप सचिव मनजिन्द्र सिंह बावा ,
प्रैस सचिव सर्बजीत सिंह बावा यांच्यासह सायकल यात्री उपस्थित होते .
ही यात्रा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचेल . दि १२ डिसेंबर रोजी सायकल यात्रेची सांगता होइल .