*ध्वजदिन निधीत योगदान देऊन सैनिकांच्या गौरवात वाटा उचलावा- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील*
फलटण टुडे (सातारा दि. 7 ) : –
देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शूर जवानांच्या बलिदानाचा, त्यांच्या देशसेवेचा गौरव म्हणून ध्वजदिन निधी संकलनास हातभार लावून खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, पोलीस उपअधीक्षक के. एन. पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, सीमांचे रक्षण करण्यासाठी हजारो शूर जवानांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्याची परतफेड कोणत्याही स्वरुपात होऊ शकत नाही. त्यांच्याप्रती गौरव म्हणून आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. हा निधी विविध योजनांच्या माध्यमातून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयासाठी वापरला जातो.
सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सैनिक हा देशाचा महत्वाचा घटक आहे. त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक विभाग, संस्थेने दिलेले निधीसंकलनाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे. तसेच विविध माध्यमातून त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. परंतु, सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने सढळ हाताने निधी संकलनास हातभार लावून त्यांच्याप्रती आदरभावना व्यक्त केली पाहिजे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
यावेळी शहिद जवान सुभेदार विजयराव शिंदे यांच्या वीरपत्नी प्रियंका विजयराव शिंदे यांना ताम्रपट देऊन सन्माणित करण्यात आले. नायक किसन फडतरे हे कर्तव्य बजावत असताना दिव्यांगत्व आल्याबद्दल 20 लाख रुपये सानुग्रह अनुदानाचा धनादेश वितरीत करण्यात आला.
शालेय परीक्षा, क्रीडा स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्या विविध कार्यालये, संस्थांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.