फलटण टुडे (पालघर,क्री. प्र. – बाळ तोरसकर) : – महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन के. डी. हायस्कूल, चिंचणी, पालघर येथे संपन्न झाले. किशोर गटात धाराशिवने ठाण्यावर तर किशोरी गटात सोलापूरने चुरशीच्या सामन्यात धाराशिववर २ गुणांनी मात करत ३८ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे विजेतपद पटकावले. किशोरांमध्ये धाराशिवचे हे सलग चौथे अजिंक्यपद आहे तर एकूण पाचवे अजिंक्यपद आहे. किशोरींमध्ये सोलापूरचे हे एकूण दुसरे अजिंक्यपद आहे. उस्मानाबादच्या हारदया वसावेला राणाप्रताप तर सोलापूरच्या मैथिली पवारला हिरकणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हारदया व मैथिली हे या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू ठरले. सलग दुसऱ्या वर्षी हारदया वासावेला राणाप्रताप पुरस्कार मिळाला.
आज पालघर येथे रविवारी (ता. ३) सकाळच्या सत्रात अंतिम सामने खेळवण्यात आले. किशोर गटातील अंतिम सामन्यात धाराशिवने ठाण्याचा ९-८ (मध्यंतर ८-४) असा सहा मिनिटे राखून एक गुणाने दणदणीत पराभव करत सलग चौथे अजिंक्यपद मिळवले आहे. मध्यंतराला धाराशीने चार गुणांची घेतलेल्या आघाडीमुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. दुसर्या आक्रमणात ठाण्याला चार गडी बाद करता आले. त्यामुळे हा सामना धाराशिवने सहज जिंकला. विजयी धाराशिवर्फे हारद्या वसावे (१.४०, २.३० मि. संरक्षण व ३ गुण), भिमसेन वसावे (१.५०, १.१० मि. संरक्षण व ३ गुण), विरसिंग पाडवी (१.३०, १.३० मि. संरक्षण) यांनी चौफेर खेळ करत मोठा विजय मिळवून दिला. तर पराभूत ठाण्याच्या ओंकार सावंत (२.२० मि. संरक्षण व १ गुण), विनायक भांगे (३ गुण) यांनी चांगला खेळ केला.
किशोरी गटाचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. शेवटच्या मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सोलापूर संघाने २ गुणांनी धाराशिवला पराभूत केले. शेवट पर्यंत थरारक ठरलेल्या या सामन्यात सोलापूरच्या स्नेहा लामकाणे (३, २.४० मि. संरक्षण व २ गुण), अनुष्का पवार (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), कल्याणी लामखणे (१.१०, १ मि. संरक्षण व २ गुण), समृध्दी सुरवसे (२.३० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी विजयात महत्वाची कामगिरी बजावली. तर पराभूत धाराशिवच्या सिद्धी भोसले (२ मिनिटे संरक्षण), मैथीली पवार (१.३० मि. संरक्षण व ६ गुण), मुग्धा वीर (२ मि. संरक्षण व १ गुण), आस्ना शेख (१.२०, २.१० मि. संरक्षण), राही पाटील (१.१० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली मात्र विजयाचे दान धाराशिवच्या झोळीतच पडले.
———–
वैयक्तिक पारितोषिके
* उत्कृष्ट संरक्षक : ओंकार सावंत (ठाणे), स्नेहा लामखणे (सोलापूर)
* उत्कृष्ट आक्रमक : भिमसेन वसावे (धाराशीव), अनुष्का पवार (सोलापूर)
* सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू
राणाप्रताप पुरस्कार : हारद्या वासावे (धाराशीव)
हिरकणी पुरस्कार : मैथिली पवार (धाराशीव)
————-
* किशोर गट: धाराशीव (विजयी), ठाणे (उपविजयी), पुणे (तृतीय), सातारा (चतुर्थ)
* किशोरी गट: सोलापूर (विजयी), धाराशीव (उपविजयी), सांगली (तृतीय), पुणे (चतुर्थ)