*सहभागासाठी जिल्हाधिकारी डुडी यांचे आवाहन*
सातारा दि. 22 ( फलटण टुडे):
यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडुन पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
यासाठी धर्मादाय आयुक्त, स्थानिक पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे. परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या इमेलवर दि. 10 जुलै ते दि. 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत विहित नमुन्यात ऑनलाईन पध्तीनेच अर्ज करण्याचे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या मंडळांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेली जिल्हास्तरीय समिती करेल व जिल्ह्यातून एका मंडळाची शिफारस राज्य समितीकडे करेल. राज्यातील पहिल्या 3 विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडुन प्रथम क्रमांकास रु.5 लक्ष, द्वितीय क्रमांकास रु.2.50 लक्ष व तृतीय क्रमांकास रु.1.00 लक्ष रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या जिल्हयातील एका मंडळास रु.25 हजाराचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. निकष आणि विहित अर्ज महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय क्र. पुलदे 2023/प्र.क्र.1/सां.का.2 दि. 4 जुलै 2023 मध्ये नमुद आहे.