**बांधकाम करताना संरचनात्मक आराखडे गरजेचे* : *इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स**

म्हसोबाचीवाडी सारखी दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी सहकार्य करणार 

फलटण टुडे ( बारामती ): 
संपूर्ण महाराष्ट्रात’ म्हसोबाचीवडी विहीर ‘ दुर्घटना हादरवणारी असली तरी तिची तांत्रिक बाजू चा अभ्यास न करता चुकीच्या पद्धतीने काम सुरू केल्याने व शासन यंत्रणेने सुद्धा प्रत्येक्ष विहिरीवर भेट देऊन पाहणी न करता , प्लॅन,नकाशा व इतर तांत्रिक बाजू तपासणी न करता दिलेली परवानगी आदी सर्व गोष्टी जमवून आल्या व सदर प्रकार घडलेला आहे 
तरी भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून संरचनात्मक आराखडे (Structural Design )गरजेचे असल्याचे मत 
इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स ( ISSE ), बारामती लोकल सेंटर व्यक्त केले आहे.

 म्हसोबाची वाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथील दुर्दैवी विहीर अपघाताच्या अनुषंगाने बारामती व इंदापूर सह दहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या ” ” “इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स “- बारामती लोकल सेंटरच्या कार्यकारिणीची बैठक बारामती मध्ये शनिवार दि.५ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या वेळी प्रथम मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली व या पुढे सरकारी, सहकारी खाजगी क्षेत्रात आशा दुर्घटना होऊ नये या बाबत चर्चा करण्यात आली.
 संस्थेचे अध्यक्ष इंजि. शामराव राऊत व उपाध्यक्ष इंजि. सुरज चांदगुडे यांनी सर्व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष अपघात स्थळ पाहणी केली व कामां मधील संरचनात्मक दृष्ट्या( Structural Design Aspects ) असणाऱ्या त्रुटी या बाबत मते नोंदवली 

1) बहुधा विहिरीच्या आर. सी. सी. रिंग कामासाठी संरचनात्मक आराखडे ( Structural Design ) केलेले नसावेत.
2) सर्व साधारणपणे अशा प्रकारच्या आर. सी. सी. रिंग कामासाठी हे काम करणारे ठेकेदार त्यांच्या पारंपारिक अनुभवानुसार कामे करतात. सदरचे काम याच प्रकारात मोडत आहे. ज्यामध्ये कोणत्याही तांत्रिक बाबींचा विचार केला गेला नाही अथवा तज्ञ संरचना अभियंता ( Structural Engineer ) यांचा सल्ला घेतल्याचे निदर्शनास येत नाही.
3) सर्वानुमते; प्रथम दर्शनी 30 फूट उंची व 125 फूट व्यास असणाऱ्या R. C . C. रिंग साठी वापरलेली 6 इंच जाडी व त्यामधील स्टील हे दोन्ही अपुरे असल्याचे निदर्शनास येत आहे.
4) अशा प्रकारच्या R.C.C. रिंग वर बाहेरील अथवा आतील बाजूने; पूर्ण परीघावर; एकाच उंचीवर; एक सारखा दाब अथवा एकसारखा ताण तयार होतो.
 संरचनात्मक दृष्ट्या एका विशिष्ट खोली अथवा उंचीवर तयार होणारा रिंग दाब ( Hoop Compression ) अथवा रिंग ताण ( Hoop Tension ) या दोघांचा विचार करून काँक्रीट जाडी, स्टील साईज व त्यामधील अंतर यांचे संरचनात्मक डिझाईन केले जाते.
5) अशा प्रकारच्या R.
C.C. रिंग डिझाईन मध्ये बाहेरील बाजूचे माती / मुरूमा चा दाब ( Earth Pressure ) व आतील बाजूने असणारा पाण्याचा दाब ( Water Pressure )विचारात घेतला जातो. तसेच बाहेरील बाजूची माती ओली ( Saturated ) असल्यास कोरड्या ( dry ) माती पेक्षा जास्त दाब तयार होतो.
 कधी कधी बाहेरील बाजूच्या मातीमध्ये पूर्णतः अथवा अंशतः खोलीवर पाणी पातळी ( submerged ) असेल तर रिंगवर येणारा दाब हा सर्वात जास्त असतो.
 अशा सर्व गोष्टींचा विचार करून संरचनात्मक डिझाईन करावे लागते.
6) केवळ पारंपारिक अनुभवाच्या आधारे व कोणत्याही तांत्रिक मार्गदर्शनाशिवाय केलेले काम अपघातास कारणीभूत ठरले आहे.

 परंतु दुर्दैवाने खाजगी विहिरी या सर्वसामान्य शेतकऱ्यांशी संबंधित असतात. यातील अज्ञानामुळे व ठेकेदारांच्या हलगर्जी पणामुळे अशी दुर्दैवी घटना होतात.
भविष्यात आशा घटना घडू नये या साठी “इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स ” सहकार्य करण्यास तयार असल्याचे मीटिंग मध्ये एकमताने ठराव पास करण्यात आला.
    तसेच बारामती लोकल सेंटर गरजू शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन व माफक दरात सुरक्षित स्ट्रक्चरल डिझाईन्स उपलब्ध करून देईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
      या बैठकीस संस्थेचे सचिव इंजि. मयूर ताडे, खजिनदार इंजि. समीर कोकरे, सहसचिव प्राचार्य विकास निर्मळ तसेच कार्यकारणी सदस्य इंजि. हर्षवर्धन शिंदे, इंजि. गणेश नरुटे, प्रा. श्रीकांत बोबडे, प्रा. शहाजी परकाळे, इंजि. दिलीप यादव व इंजि. संजय कदम आदि उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!