फलटण टुडे (सातारा दि.18) :
शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर पीकस्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामातील भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबिन भूईमूग, सूर्यफुल या 11 पिकांचा खरीप हंगाम पीक स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीकस्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे भात पिकाखालील किमान 20 आर (0.20 हेक्टर) व इतर पिकांसाठी 0.40 आर (0.40 हे) सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे..
पीकस्पर्धांसाठी तालुका हा घटक निश्चित केला असून ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांकरिता पीकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजीत केली जाणार आहे. पीकस्पर्धांसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी तीनशे रुपये प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल. तालुका पातळीवर स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा व राज्यपातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत..
तालुका पातळीवर यापूर्वी कधीही प्रथम तीन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हा पातळीवर पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. या बरोबरच जिल्हा पातळीवर यापूवी कधीही प्रथम तीन आलेले शेतकरी राज्य पातळीवर सहभागी होण्यास पात्र असतील, तालुका व जिल्हा पातळीवर पीक स्पर्धा स्वतंत्र होतील.
शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. पूर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते आता सर्व पातळीवर एका पिकसाठी रु 300 प्रति शेतकरी प्रवेश शुल्क भरुन पीककापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका / जिल्हा / राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे.
याशिवाय पारितोषिकांच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. तालुका पातळी सर्व साधारण व आदिवासी गट पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे-3 हजार, तिसरे-2 हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले 10 हजार, दुसरे- 7 हजार, तिसरे-5 हजार, राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे40 हजार, तिसरे -30 हजार रुपये या प्रमाणे बक्षिस आहेत.
खरीप हंगाम 2023 साठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै 2023 व भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबिन, भूईमूग, सूर्यफुल, या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2023 असून जास्तीत जास्त शेतक-यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व उपविभागीय कृषि अधिकारी या कार्यालयांशी संपर्क साधावा.