फलटण टुडे (सातारा दि.18) :
पुरवठा विभागाचा पर्यावरण संवर्धनामध्ये खारीचा वाटा असावा या उद्देशाने पुणे विभागात सन 2023 मध्ये, पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण कुटूंबासाठी “एक कुटूंब एक झाड” मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये तालुक्यातील शासकीय धान्याचा लाभ घेणाऱ्या पात्र कुंटूबाची संख्या विचारात घेवून यामध्ये प्रामुख्याने, शक्य असेल तिथे देशी प्रजातीच्या वृक्षांची रोपे (उदा. चिंच, जांभूळ, लिंब, उंबर, वड, पिंपळ, बांबू अथवा कोरफड, तुळस, गवती चहा इ.) स्थानिक पातळीवर विनामुल्य उपलब्ध होणार आहेत. उपलब्ध होणारी रोपे रास्त भाव दुकानदारांमार्फत प्रत्येक ग्रामीण भागातील कुटूंबास मोफत वाटप करणे, दि.15 ऑगस्ट, 2023 रोजी या रोपांची सुनिश्चित ठिकाणी लागवड करणे, तसेच देखभालीची जबाबदारी संबंधित कुटूंबावर देणे, या अनुषंगाने योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे वैशाली राजमाने जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांनी कळविले आहे.
तसेच पुणे विभागातील सर्व रास्त भाव दुकाने, गोदामे तसेच पुरवठा विभागाची कार्यालये “आयएसओ” मानांकनाने गौरविण्यात आली आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार व पुरवठा विभागाशी निगडीत सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. या नाविन्यपूर्ण योजनेची दखल राज्य व केंद्र शासनाने घेवून ही योजना संपूर्ण देशभर राबविणेचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी कळविले