फलटण टुडे (सातारा, दि. 21 ) : –
शासनाच्या धोरणानुसार मोठ्या, मध्यम व लहान धरणांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करा अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंचन विभागाचा आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
यावेळी सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदेंसह सिंचन विभागाली कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.
गाळ काढण्यासाठी जलसंधारण विभागाने कार्यवाही सुरू करावी असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, सिंचन विभागाने यासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. जलसंधारण विभागाने ग्रामपंचायतींची मागणीपत्रे घ्यावीत. कोयना धरणातील गाळ काढण्यासाठी पोलीस विभागाची परवानगीही घेण्यात यावी. तसेच हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठीही मागणीपत्रे घेण्यात यावीत. गाळ काढत असताना समान खोलीने काढण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. शिंदे यांनी यावेळी जिल्ह्यात काम सुरू असणाऱ्या सिंचन प्रकल्पांचा सविस्तर आढावा सादर केला. त्यामध्ये धोम – बलकवडी, उरमोडी, तारळी यासह जिहे – कठापूर उपसा सिंचन योजना यांचाही समावेश होता. या योजनांची प्रगती तसेच योजना पुर्ण होण्यामध्ये असलेल्या अडचणी यांची माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी घेतली.
तसेच सिंचन विभागाकडे असलेल्या धरणांचाही आढावा यावेळी घेतला. जून अखेर पर्यंत करण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनाचा आढावाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी घेतला.