बारामतीत कालव्यात बुडणाऱ्या युवकास सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून जीवदान

पाण्यामध्ये असणारे छगन लोणकर बुडणाऱ्या युवकास वाचवताना

छगन लोणकर यांचा सत्कार करताना सहकारी

फलटण टुडे (बारामती ): 
बारामती शहरातील देसाई इस्टेट नजीक नीरा डावा कालव्यात बुडणाऱ्या एका युवकास सेवानिवृत्त जलसंपदा विभागाचे अधिकारी छगन लोणकर यांनी जीवदान दिले. बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याच्या देसाई इस्टेट बाजूने दोन युवक मंगळवारी (ता. १३) सकाळी नऊच्या सुमारास जात होते. त्यावेळी एक युवक पाय घसरून कालव्यात पडला. ते पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याच्या सोबत असलेल्या युवकाने पाण्यात उडी मारली. मात्र, पहिला पडलेला युवक त्याला धरून ठेवत असल्याने घाबरून दुसऱ्या मुलाने पुन्हा काठावर येण्याचा प्रयत्न केला.

त्याच वेळेस वुई द फ्युचर ग्रुप चे सदस्य चालण्याचा व्यायाम करीत होते त्यापैकी छगन लोणकर यांनी कसलाही विचार न करता पाण्यात उडी घेत त्या बुडणाऱ्या मुलाला काठावर आणले. लोणकर यांच्यासमवेत विविध फ्युचर ग्रुपचे सदस्य डॉ. नितीन काळे, डॉ. कपिल सोनवणे, संदीप मोकाशी, डॉ. रवींद्र चव्हाण यांनीही त्याला कालव्याबाहेर काढण्यास मदत केली. काठावर आल्यानंतर काही वेळानंतर तो स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याला घरी नेले गेले. लोणकर यांनी नीरा देवघर प्रकल्पाअंतर्गत भोर येथे काम करताना भाटघर धरणात दहा वर्षे पोहण्याचा सराव केलेला असल्याने ते उत्तम जलतरणपटू आहेत, त्यांच्या या सरावाचा फायदा एका मुलाचा जीव वाचण्यामध्ये झाला. पोहण्याचा आज एका व्यक्तीला जीवदान देण्यात फायदा झाला याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

 फ्युचर ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र मेहता व वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या सदस्यांनी छगन लोणकर यांचा सत्कार केला 


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!