**
फलटण टुडे (बारामती ): –
1 ऑगस्ट 2023 ते 12 ऑगस्ट 2023 या दरम्यान दक्षिण कोरिया या देशात 25 वी जागतिक स्काऊट जांबोरी पार पडणार आहे.या जांबोरीसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ या शाळेतील सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सन 2021 साली भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय मुख्यालय, दिल्ली या कार्यालयाकडे महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड यांच्यावतीने ज्ञानसागराच्या राज्य पुरस्कार प्राप्त व पंतप्रधान ढाल स्पर्धेत सहभागी झालेल्या सात विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2023 ला भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय मुख्यालय, दिल्ली यांच्या कार्यालयाकडून भावना रावत, आदित्य चव्हाण, दिव्या आटोळे, संस्कार रायते,स्वयम कुंभार, प्रणव भरणे ,अर्थव खताळ व स्काऊट मास्टर प्रा. सागर आटोळे यांची निवड करण्यात आली. जागतिक स्काऊट जांबोरी ही स्पर्धा दर पाच वर्षांनी जागतिक स्तरावर आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत जगातील सर्व देशातील काही ठराविक विद्यार्थ्यांची निवड करुन त्या विद्यार्थ्यांला या जांबोरीतील विविध स्पर्धेत सहभागी करून घेतले जाते. या जांबोरीत सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला दहावी किंवा बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 15 वाढीव गुण दिले जातात. आशा जागतिक स्काऊट जांबोरीसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून ज्ञानसागर गुरुकुल च्या सात विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल देशामध्ये या शाळेचे , विद्यार्थ्यांचे व संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर मानसिंग आटोळे व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांचे कौतुक करण्यात येत आहे.