फलटण टुडे (सातारा, दि. 7 ) : लवकरच पुणे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर मार्गिका शिस्त (नियम), शिरस्त्राण, सिटबेल्ट व अतिवेगाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती परिवहन उप आयुक्त (रस्ता सुरक्षा)भरत कळसकर यांनी दिली.
राज्याचे परिवहन उप आयुक्त, (रस्ता सुरक्षा श्री. कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील अपघात विश्लेषण व उपाययोजनांबाबत कार्यकारी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. विनोद चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा, श्री. विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड, श्री. संदीप म्हेत्रे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा तसेच मोटार वाहन निरीक्षक श्री. जकीउद्दीन बिरादार, श्री. दिग्विजय जाधव, श्रीमती आफ्रीन मुलाणी, श्री. मारुतीराव पाटील, श्री. योगेश ओतारी, श्री. गजानन गुरव, श्री. संजय कांबळे, श्री. सुरेश माळी, श्री. संदीप भोसले, श्री. चैतन्य कणसे, श्री. रविंद्र चव्हाण व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते.
मा. सर्वोच्च न्यायालय यांनी अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना राबविणेकामी समिती गठीत केली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील अपघात 30% नी कमी करण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच याबाबत सर्व संबंधित विभागांनी पार पाडावयाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. परिवहन विभागासाठी मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. अपर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. परिवहन उप आयुक्त, (रस्ता सुरक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे विविधांगी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
1. तालुकानिहाय आढावा :-
जिल्ह्यात होणारे अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक अपघाताचे विश्लेषण करण्यात येत असून कारणमिमांसा करुन त्यावर करण्यात येणारी उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यामध्ये कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
2. निधीची उपलब्धता :-
रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या वार्षिक जिल्हा विकास आराखड्याच्या 1% निधी उपलब्ध करुन देणेबाबत शासन निर्णय जारी झालेला असून महानगरपालिका क्षेत्र व जिल्हा परिषद यांच्यामार्फत स्वतंत्र Budget Head सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा उपाययोजना त्यामार्फत राज्यस्तरावर करण्यात आलेली आहे.
3. रस्ता सुरक्षा कक्ष :-
परिवहन कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा कक्षाची निर्मिती करण्यात येणार असून त्यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित कक्षामधून नियमितपणे केवळ रस्ता सुरक्षा विषयक कामकाज चालणार आहे. त्यामधून अपघाताबाबत माहिती संकलित करणे, त्याचे विश्लेषण व अपघात कमी करण्यासाठी उपाययोजनांचे कार्यान्वयन या कक्षामार्फत करण्यात येणार आहेत.
4. तालुकानिहाय रस्त्याचे सर्व्हे :-
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक रस्त्यावरती कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबतचा सर्व्हे करुन त्याबाबतच्या उपाययोजना करुन संबंधित विभागास कळविण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी करुन घेतल्यास अपघात रोखण्यासाठी मोठी उपलब्धता होणार आहे. स्थानिक परिस्थितीचा विचार करुन अपघात होण्यासाठी जे घटक कारणीभूत आहेत त्याचा विचार करुन त्या त्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करावयाच्या आहेत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
5. धोरणात्मक बाब :-
कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी छोटे रस्ते मोठ्या रस्त्यांना मिळतात त्या त्या ठिकाणी नियमानुसार व आवश्यकतेप्रमाणे गतीरोधक, रम्बलर स्ट्रीप्स व धोक्याचे इशारे देणारे फलक प्रदर्शित करुन त्याबाबत जनजागृती करणेत येणार आहे. तसेच रस्त्यालगत असणारे गावे यांच्यासाठी सुध्दा जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. तालुकानिहाय नियुक्ती अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवून त्यासाठी व्यापक प्रसिध्दी देण्याचे नियोजन करण्यात आले.
6. जनजागृती व अंमलबजावणीबाबत :-
अपघाताचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळून आले आहे की, सर्वाधिक अपघात हे दुचाकी वाहनांचे त्यानंतर चारचाकी वाहनांचे असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिरस्त्राण परिधाण करणे, अतिवेगाने वाहन न चालविणे व सिटबेल्टचा वापर करणे तसेच पादचाऱ्यांनी फुटपाथ नसलेल्या ठिकाणी उजव्या बाजूने चालणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.
7. नाविन्यपूर्ण उपक्रम :-
आगामी काळामध्ये सातारा, कराड व कोल्हापूर कार्यालयामार्फत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती अतिवेग, लेनची शिस्त, दुचाकीस्वाराकडून शिरस्त्राणचा वापर तसेच चारचाकी वाहनांसाठी सिटबेल्टचा वापर याबाबत सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम हाती घेऊन वाहन चालकांच्या सवयीमध्ये बदल घडवून आणण्यात येणार आहे. व्यापक जनजागृतीनंतर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
बैठकी दरम्यान सातारा व कराड कार्यालयाचे अपघात विश्लेषण उपाययोजनाबाबत माहितीचे संकलन करणे, माहिती विश्लेषण करणे, त्यानुसार कृती आराखडा तयार करणे, अपघात ठिकाण व अपघाताची कारणे याचे निश्चितीकरण करणे, यासाठी नियुक्त अधिकारी यांनी कर्तव्य भावनेने कामकाज केल्याने समाधान व्यक्त केले व आगामी काळामध्ये अपघात कमी करण्यासाठी सर्वोतोपरी योगदान देणेबाबत सूचित करण्यात आले.
आढावा बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी अपघात कमी करणेसाठी मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. अपर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. परिवहन उप आयुक्त, (रस्ता सुरक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी प्रयत्न करणेची ग्वाही दिली.