फलटण टुडे (सातारा, दि. 15 ) : –
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः 3 महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते.
वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जातवैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशापासून वंचित राहू नये या हेतूने आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांनी दि. 07 नोव्हेंबर 2022 पासून आज तागायत संपुर्ण सातारा जिल्ह्यात “मंडनगड पॅटर्न” राबवून जिल्ह्यातील 12 वी शास्त्र शाखेत सन 2022-23 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय / तालुकानिहाय प्रत्यक्ष प्रस्ताव स्विकृती शिबीरे आयोजित करुन ( 12 वी शास्त्र ) विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले आहेत. तथापि चालु वर्षात 12 वी शास्त्र अभ्यासक्रमात शिकणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप समितीस जात पडताळणीसाठी अर्ज केला नाही किंवा अर्ज केला आहे परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, अथवा ज्या विद्यार्थ्यांचे प्रकरण त्रुटीयुक्त आहे अशा सर्व ( 12 वी शास्त्र ) विद्यार्थ्यांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा या कार्यालयात दि. 31 मार्च 2023 पूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहुन जात पडताळणी अर्ज / त्रृटीपुर्तता करावी असे आवाहन स्वाती इथापे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.