इन्फल्यूएंझा ए (H3 N2) विषयी खबरदारी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

फलटण टुडे (सातारा दि. 17 ) : – 
सध्या राज्यात फ्लु अर्थात एच 3 एन 2 या इन्फल्यूएंझाची साथ आहे. इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. या आजाराविषयी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


* आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.* ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला , नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, बालरुग्णांमध्ये सौम्य व मध्यम स्वरुपाचा ताप आढळतो, घसादुखी असणऱ्या बाळांमध्ये तोंडातून अतीप्रमाणात लाळ गळताना आढळते, काही रुग्णांना जुलाब व उलटया होतात.


लक्षणानुसार रुग्णांची पुढीलप्रमाणे वर्गवारी करण्यात येते. वर्गवारी अ – लक्षणे – सौम्य ताप ( 38 अंश सेल्सिअस पेक्षा कमी ) खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलटया. यावर पुढीलप्रमाणे उपाययोजनाकराव्यात स्वॅबची आवश्यकता नाही. घरच्याघरी विलगीकरण करावे. 24 ते 48 तासामध्ये लक्षणे वाढलेस ऑसेल्टामीवीर सुरु करावी.


वर्गवारी ब – लक्षणे – वरील लक्षणांशिवाय तीव्र घसा दुखी/ घशाला सूज व ताप ( 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त), निवडक अति जोखमीच्या रुग्णांचा स्वॅब घ्यावा. उपाययोजना- ऑसेल्टामीवीर सुरु करावी. घरी विलगीकरण करावे.

वर्गवारी क – लक्षणे- वरील लक्षणांशिवाय धाप लागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, मुलांची चिडचिड व झोपाळू पणा, प्रत्येक रुग्णांचा स्वॅब घ्यावा. उपाययोजना- ऑसेल्टामीवीर सुरु करावी. रुग्णालयात भरती व्हावे.

अतिजोखमीच्या व्यक्ती- इन्फल्युएंझा हा आजार पुढील अतिजोखमीच्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरुप धारण करु शकतो. 5 वर्षाखालील मुले (विशेष करुन 1 वर्षाखालील बालके), 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हद्यरोग, मधुमेह स्थूलत्व, फुप्प्फुस ,यकृत, मूत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती, प्रतिकार शक्तीचा ऱ्हास झालेली व्यक्ती, दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती.

खाजगी रुग्णालयांना परवानगी:- इन्फल्युएंझा उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा असणाऱ्या राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांना इन्फल्युएंझा उपचाराची मान्यता आहे. या करिता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही. तथापि, वेळोवेळी देणेत आलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.

इन्फल्युएंझा टाळण्यासाठी हे करा – वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा, पौष्टिक आहार घ्या, लिंबु , आवळा, मोसंबी , संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. धुम्रपान टाळा, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या.

इन्फल्युएंझा टाळण्याकरता हे करु नका – हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका, आपल्याला फल्यू सदृश्य् लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, फल्यू रुग्णाची घरगुती काळजी, घर मोठे असेल तर रुग्णाकरिता वेगळी खोली निश्चितच करावी, रुग्णाने स्वत: नाकावर साधा रुमाल बांधावा. रुग्णाने शक्यातो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटूंबिय असतील तेथे येणे टाळावे, रुग्णाने सेवा शक्यतो कुटूंबातील एकाच व्यक्तीने करावी, रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये, घरात ब्लिच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा, रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतरत्र टाकू नयेत, रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत, रुग्णाचे अंथरुण पांघरुण टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत, रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी आणि द्रव पदार्थ घ्यावेत, रुग्णाने धुम्रपान करु नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत, दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात तसेच गरम पाण्यात निलगिरी तेलामध्ये मेंथॉल टाकून त्याची वाफ घ्यावी, ताप आणि इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान २४ तासापर्यंत घरी राहावे, धाप लागणे , श्वास घेताना छातीत दुखणे , खोकल्यातून रक्त् पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलटया अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.

शाळा व शैक्षणिक संस्था करिता महत्वाच्या सूचना – वरील लक्षणे आढळणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांना कळवून तपासणी करून घेणेत यावी. लक्षणे आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना घरातील इतर कुटूंब सदस्यांची तपासणी करणेची सूचना देणेत यावी.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!