फलटण टुडे (मुंबई, दि. 28 ):
पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक हा अस्मितेचा विषय आहे. या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
याबाबत अधिकची माहिती देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारताना रेडीरेकनर व बाजार मूल्यानुसार भाडेकरूंना योग्य मोबदला मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व नगरविकास विभाग यांच्या समवेत लवकरच बैठक घेण्यात येईल.
सदस्य चेतन तुपे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.