तांबेवाडी, ता.माळशिरस : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील राज्यकारभारामध्ये भारतीय लोकशाहीची बीजे रोवली होती. भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा हि छत्रपतींचीच होती. निःपक्ष निरपेक्ष राज्यपद्धतीतून त्यांनी राज्यकारभार केला असल्याचे सांगत आजच्या युवा पिढीने छ.शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजेत अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केली.
तांबेवाडी ता.माळशिरस येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, जय शिवराय तरुण मंडळ व गणेश तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती महोत्सव व्याख्यानमालेत “छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक युवा पिढी” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.आढाव बोलत होते. यावेळी सरपंच संताजी बोडरे, सोसायटीचे चेअरमन संजय साळुंखे, माजी उपसरपंच तुषार भोईटे, शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र तांबे, हरिभाऊ सकट, माजी सरपंच मेघा साळुंखे, बचत गटाच्या माधुरी तांबे, विलास भोईटे, सुभाष साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.
छ.शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. तत्कालीन अनेक राजांनी वारसा हक्काने राज्य चालविले मात्र छ.शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्य चालविल्यामुळे रयतेला त्याकाळी स्वतःचे राज्य असल्याची भावना होती. तरुण वयात तोरणा किल्ला जिंकला असल्याचा पराक्रम व छ.शिवाजी महाराजांनी केलेले काम आधुनिक युवा पिढीला आदर्शवत असून युवकांनी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजेत अशी अपेक्षा प्रा.आढाव यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, शालेय विद्यार्थिनी सई भोसले, स्वरा चंकेश्वरा, स्वाती भापकर यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दुग्धव्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या व्याख्यानमालेस बाळासाहेब तांबे, सागर तांबे, हनुमंत शिंदे, ज्ञानदेव पवार, ज्ञानदेव तांबे, सतीश वाघमारे, बाळासाहेब धाईंजे, नमो इंगवले, अभिजीत शिंदे, स्वाती तांबे, अशोक देवकर, किशोर साळुंखे, रणजित साळुंखे, रोहिणी भोईटे, संगीता तांबे, रुपाली शिंदे, स्वप्नील साळुंखे, किसान चव्हाण, संतोष शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे व तरुण मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार विलास भोसले यांनी केले. आभार किशोर साळुंखे यांनी मानले.