फलटण टुडे (फलटण ) :-
राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका पंचायतसमिती, जिल्हापरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या दिड वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे सर्वांगिण विकासास मोठी खिळ बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरपालिका, महानगरपालिका, पंचायतसमिती तसेच जिल्हापरिषदेच्या निवडणूका त्वरित घ्याव्यात अशी मागणी कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केली आहे.
राज्यातील जवळपास सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न शिंदे फडणविस सरकार तसेच या पुर्वीच्या सरकारच्या धोरणामुळे ओ.बी.सी.आरक्षण तसेच प्रभागरचना या मुद्यावर न्यायालयात अडकून पडला असल्याने गेल्या दिड वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. अशाप्रकारची वेळी या पुर्वी कधी निर्माण झाली नव्हती प्रशासकीय राजवटी मुळे या संस्थांमधे मोठ्या प्रमाणात एकाधिरशाही तसेच मनमानी कारभार वाढला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
नगरपालिका वार्ड परिसरातील प्रश्न नागरिक नगरसेवकांच्या माध्यमातून सोडवून घेत असतात तसेच पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आपल्या भागातील आरोग्य, रस्ते, विज,पाणी, शैक्षणिक सामाजिक प्रश्न प्रशानाच्या माध्यमातून सोडवून घेतात परंतु गेल्या दिड वर्षापासून प्रशासक असल्यामुळे मुळे सर्वसामान्य नागरिकांना कुणीही वाली राहिला नाही. प्रशासकीय कालावधीत अनेकांना नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्याच्या संधी पासुन वंचित रहावे लागले आहे, त्या मुळे लोकशाहीला काळीमा फासल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज गेली दिड वर्षे प्रशासक आहे परंतु यावर गांभीर्याने कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे प्रशासकीय कारभार पाहणाऱ्याना रान मोकळे झाले आहे. तरी शासनाने न्यायालयात स्थानिक स्वराज्यसंस्थाबाबतची योग्य ती माहिती न्यायालयात सदर करून त्वरित निवडणूक लावण्याची विनंती करावी अन्यथा सर्वच राजकीय पक्षांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल तसेच नगरपालीका, महानगरपालिका, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूका त्वरित जाहिर न झाल्यास सत्ताधारी पक्षाला मोठ्या परिणामास सामोरे जावे लागेल असा इशारा दशरथ फुले यांनी दिला आहे.