पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी फलटणच्या पत्रकारांचे निवेदन

फलटण टुडे (फलटण) : 
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा तपास युद्ध पातळीवर व्हावा व घटनेची सुनावणी फास्टट्रैक
कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशा मागणीचे निवेदन मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण तालुका शाखेने येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिले आहे. 

सकाळी ११ वाजता येथील अधिकार गृहात असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जावून पत्रकारांनी हे निवेदन दिले. या निवेदनात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनातील आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखला करण्यात आला असून या घटनेची सुनावणी फास्टट्रैक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी,पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जात आहे.

 त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, यशवंत खलाटे, लखन नाळे, वैभव गावडे, राजकुमार गोफणे, प्रशांत रणवरे, विकास शिंदे, किसन भोसले, युवराज पवार, विक्रम चोरमले, शक्ती भोसले, अनमोल जगताप, काकासाहेब खराडे, विजय भिसे, अभिषेक सरगर, योगेश गंगतीरे,उमेश गार्डे, संजय गायकवाड यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!