फलटण टुडे (वेळे ता. वाई) :
यशोधन अनाथाश्रमास पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते जीवनाश्यक वस्तूंचे वितरण
– मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यशोधन अनाथाश्रमात आरोग्य सप्ताहाचे आयोजन
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वेळे (ता. वाई) येथील यशोधन अनाथाश्रमात आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज यशोधन अनाथाश्रमास सदिच्छा भेट दिली. यावेळी यशोधन अनाथाश्रम करत असलेल्या समाजकार्याची माहिती त्यांनी घेतली.
रवी बोडके व सोनल बोडके हे दाम्पत्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून यशोधन अनाथाश्रम उभे केले आहे. आपण अनेकदा पाहतो की, बेघर, अनाथ झालेल्यांना असहायपणे जीवन जगत राहावे लागते. पण वेळे येथील यशोधन अनाथाश्रम अशा अनाथ, बेघरांना सांभाळण्याचे काम करत आहे. औषधोपचाराबरोबरच विविध सुविधा हे अनाथाश्रम मोफत पुरवत आहे.
यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अशा सकारात्मक आणि समाजहिताच्या कामाच्या पाठीशी कायम उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अनाथाश्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत, तसेच विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले. अनाथाश्रमाकडे येणाऱ्या रस्त्याचे काम करण्याबाबत आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या समाजसेवी कार्याला शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याप्रसंगी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवासानिमित्त मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते अनाथाश्रमात जीवनाश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.