कांदाटी खोरे- विकास दृष्टीकोन आणि ध्येय

 फलटण टुडे (सातारा ) :
       कांदाटी खोऱ्यातील बरीचशी गावे ही कोयना धरणात गेली आहेत. हे खोरे कोयनेच्या जलाशयाने वेढलेले आहे. या खोऱ्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. तापोळा, बामणोली या भागाला तर मिनी काश्मिर असे म्हटले जाते. येथे येणा-या पर्यटकांचा ओढा बघता येथे पर्यटन वाढीसाठी व स्थानिकांच्या रोजगारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदाटी खोऱ्यातील 16 गावांसाठी पर्यटन व रोजगार निर्मितीबाबत आराखडा प्रशासनास तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. या आराखड्या विषयी माहिती.

            या अराखड्यानुसार उपजिविकेच्या पर्यायांमध्ये विविधिता उपलब्ध करुन देणे (कृषी, वन, पशुधन, पर्यटन, पाणी आणि स्वच्छता). पर्यटनाच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा. रस्ते जोडणी आणि दळवळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा. पाणलोट क्षेत्र आणि झऱ्यांच्या व्यवस्थापनाविषयी वाव. पर्यटन अनुभवामध्ये विविधता (धार्मिक, साहसी, निसर्ग, जल पर्यटन) ऑनलाईन सेवांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी विकसित करणे सेवा प्रदाता आणि उद्योजक म्हणून स्थानिकांचा कौशल्य विकास आणि क्षमता वर्धन व क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता समुहांना योग्य संधी उपलब्ध करुन देणे.

            लोकांची उद्योजकता, पर्यटन आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन यावर आधारित लोकं-सरकारी व्यवस्था आणि खासगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून पर्यावरण पूरक, शाश्वत आणि एकात्मिक विकासासाठी सक्षम लोक समुदाय तयार करण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय लोक समुदाय, कौशल्य आणि क्षमता बांधणी, तांत्रिक आणि व्यवस्थापन सहाय्य व हवामान बदलाशी सुसंगत कार्यपद्धती यावर भर देण्यात येणार आहे.

            पर्यटनस्थळांच्या ठिकाणी होम-स्टे व्यवस्था विकसित करणे, जलाशय काठच्या ठिकाणी टेंट व कॉटेजेसची व्यवस्था, जंगलातील मुक्काम स्थळे विकसीत करणे. कृषी पर्यटन स्थानिक जीवनाशी आणि कृषी पद्धतींचा अभ्यास, निसर्ग प्रेमींसाठी दरदिवशी किंवा शनिवार-रविवार निसर्ग सहलींचे नियोजन करणे. नौका पर्यटन आणि जंगल मुक्कामासह ट्रेकींगची सोय उपलब्ध करुन देणे. डोंगर माथ्यांवरील आकाश निरीक्षण सहलींचे नियोजन, दोन-तीन प्रमुख ठिकाणी (उत्तेश्वर, पर्वतेश्वर, चकदेव) उत्सव आशा पर्यटन स्थळांचा विकास व इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवून वर्क-एन-रिलॅक्स सुविधांसह होम-स्टे आणि रिसॉर्ट्स विकसित करणे. प्रवेश रस्ते व पार्किंग विकसित करणे, टेंटसाठीची जागा, रस्ते यांचे व्यवस्थापन. बेटांवर जाण्यासाठी छोट्या बोटींची सुविधा विकसित करणे पर्यटकांसाठी मंडप आणि स्टॉल्सचे नियोजन, स्वच्छतागृहे व कॅफेटेरिया यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

            पशुधनावर आधारित शेतकरी उत्पादक संघटना विकसित करण्यात येणार असून बिझनेस प्लान तयार करण्यात येणार आहे. तसेच दुधाची उत्पादकता वाढविणे, दुधावर प्रक्रिया करणे आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. औषधी वनस्पती, बांबू असे वन उत्पादन गोळ करणे व पुढील व्यवस्था विषयक व्यवसाय योजना तयार करण्यात येणार आहे. मध गोळा करणे, मधावरील प्रक्रिया आणि मधाची विक्री या विषयही योजना तयार करण्यात येणार आहे.

            तापोळा, महाबळेश्वर, खेड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा, कांदाटी खोऱ्यातील 16 गावांसाठी सुधारित ॲप्रोच रोड कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येणार असून जलवाहतुकीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

            भविष्यातील विकासाचा विचार करता या भागात तयार होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संघटन आणि व्यवस्थान, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन सुविधांच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता सर्व गावांसाठी सुधारित आरोग्य सुविधांची उपलब्धता, आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी तात्काळ पोहचविण्याची सुविधा 16 गावांसाठी आराखड्यानुसार करण्यात येणार आहे.

            पर्यटन व रोजगार निर्मिती आराखड्याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही वारंवार बैठका घेवून वेळोवेळी बहुमूल्य अशा सूचना केल्या आहेत. आराखडा लवकरच तयार होवून त्यांची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार या भागातील स्थलांतर कमी होवून नागरिकांना गावातच रोजगाराबरोरच सर्व सुविधा मिळणार आहेत.

                                                                        जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!