खेलो इंडिया 2022-23 गत वेळेच्या चॅम्पियन महाराष्ट्र खो-खो संघाची डावाने विजयी सलामी

दमदार विजयाने मिशन खेलो इंडिया युथ गेम्स ला सुरुवात, महाराष्ट्राने उघडले विजयाचे खाते

फलटण टुडे वृत्तसेवा( जबलपूर ) :-
राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र आणि जानव्ही पेठे यांच्या कुशल नेतृत्वाखाली चॅम्पियन महाराष्ट्र खो-खो संघांनी पाचव्या किताबाच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. चार वेळच्या पदक विजेत्या महाराष्ट्र खो खो संघांनी सोमवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये डावाने विजय सलामी दिली. यासह या दोन्ही संघांनी महाराष्ट्राला स्पर्धेत विजयाचे खाते उघडून दिले. सोमवारी मोठ्या जल्लोषात पाचव्या सत्रातील खेलो इंडिया स्पर्धेला सुरुवात झाली.

*सुहानी, प्रीतीने गाजविले जबलपूरचे मैदान*
सुहानी धोत्रे प्रीती काळे संपदा मोरे आणि अश्विनी यांनी सर्वोत्तम कामगिरी करत जबलपूर चे खो-खो मैदान गाजवले. त्यामुळे जानवी च्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाला पहिल्याच दिवशी डावाने विजय साजरा करता आला. महाराष्ट्र महिला संघाने सलामी सामन्यात तामिळनाडू वर एक डाव नऊ गुणांनी विजय संपादन केला. यादरम्यान सुहानी धोत्रेचे संघाचे विजयातील योगदान मोलाचे ठरले.. तिने सात विकेट घेत दीड मिनिट खेळी केली. तसेच प्रीती काळेने अडीच मिनिटे संरक्षण करत मैदानावर लक्षवेधी कामगिरी केली.. यादरम्यान डिफेन्स मध्ये अश्विनी ची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

 नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विजय
गत चॅम्पियन महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने सलामी सामन्यात तेलंगणा टीमला डावाने पराभूत केले. कर्णधार नरेंद्रने अष्टपैलू कामगिरी करताना संघाला विजय मिळवून दिला. त्याने पाच गडी बाद करत अडीच मिनिटे संरक्षण केले. याशिवाय औरंगाबादच्या सचिन पवारने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले त्यामुळे महाराष्ट्र संघाला एकतर्फी विजय साजरा करता आला.

यजमान मध्य प्रदेश समोर आज महाराष्ट्राचे आव्हान
डावाने विजय सलामी देणारा महाराष्ट्र संघ आता सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. यजमान मध्य प्रदेश संघाला मंगळवारी गटातील दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र महिला आणि पुरुष खो-खो संघाचा गटातील दुसरा सामना आज मध्य प्रदेश टीमशी होणार आहे. त्यामुळे यजमान संघाला घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!