लोकशाहीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्वाचा – जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

फलटण टुडे (सातारा ), दि.25 : 
जगात सर्वांत मोठी व बळकट अशी भारताची लोकशाही आहे. या पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे. हा टक्क्‍ वाढविण्यासाठी व लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी तरुणांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार राजेश जाधव आदी उपस्थित होते.

भारत हा पहिलाच देश आहे की स्वातंत्र्यानंतर सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे म्हणून सुट्टी जाहीर करण्यात येते. परंतु अनेक मतदार सुट्टी असूनही मतदान करत नाही. घटनेने आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार मुलभूत असून मतदान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व हक्क आहे.

भारत निवडणूक आयोग हे निवडणुका पारदर्शकपणे पार पाडतात त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर आजही नागरिकांचा मोठा विश्वास आहे. आपल्या राज्य घटनेने 18 वर्षांवरील समाजातील प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क दिला आहे. याचा आदर्श इतर देशांनी घेतला आहे. ज्या युवकांना 18 वर्ष पूर्ण होणार आहेत अशा युवकांनाही मतदार यादी नाव नोंदविता येईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी उपस्थितांना मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीस अधीक्षक श्री. शेख म्हणाले, 13 वा मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या मतदार दिनानिमित्त मतदारांना त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव करुन दिली जात आहे. माझं मत माझं भविष्य हे या वर्षीच घोषवाक्य आहे. याचे महत्व तरुण पिढीला सांगा.

माझं मत माझं भविष्य हे या वर्षीच घोष वाक्य आहे. या घोष वाक्यानुसार जनजागृती करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विविध सोयी-सुविधा देण्यात येत आहे. तसेच मतदार यादी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया अंत्यत सुलभ झाली आहे. नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, असे प्रास्ताविकात श्रीमती सावंत-शिंदे यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग या विषयी पथनाट्य सादर केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्र वाटपाबरोबर निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!