‘‘मोठ्या उद्योगांना सहकार्य करणारे छोटे उद्योग फलटणमधील तरुणांनी उभे करावेत’’ : श्रीमंत संजीवराजे

फलटण, दि. 18 : ‘फलटणची उद्योग भरारी’ या परिसंवादात बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. व्यासपीठावर पद्मश्री डॉ.अनिल राजवंशी, दिलीपसिंह भोसले, सचिन यादव व संवादक प्रा. सतीश जंगम.

फलटण टुडे (फलटण), दि. 18 :

‘‘मोठ्या उद्योगांना सहकार्य करणारे छोटे उद्योग फलटणमधील तरुणांनी उभे करावेत’’, अशी अपेक्षा व्यक्त करून ‘‘फलटणमध्ये पर्यटन वाढीलाही मोठा वाव आहे; त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा’’, असे आवाहन ‘गोविंद मिल्क’चे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या फलटण तालुका संस्कृती महोत्सवात ‘फलटणची उद्योग भरारी’ या परिसंवादात श्रीमंत संजीवराजे बोलत होते. व्यासपीठावर परिसंवादातील सहभागी उद्योजक निंबकर अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक पद्मश्री डॉ.अनिल राजवंशी, श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, के.बी.एक्सपोर्ट प्रा.लि; चे संचालक सचिन यादव, परिसंवादाचे संवादक प्रा.सतिश जंगम उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, ‘‘उद्योग व्यवसायामध्ये तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे असून फलटणमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उद्योग क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसाय उभारताना येणार्‍या अडचणी सोडवून प्रामाणिकपणे, चिकाटीने व सर्व सहभागी घटकांना बरोबर घेऊन उद्योग व्यवसाय केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो.’’
पद्मश्री अनिल राजवंशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना, ‘‘आपल्या परिसरामध्ये असलेल्या समस्या शोधून त्या कशा सोडवता येतील याबाबतचा विचार केल्यास आपल्याही मनात संशोधन वृत्ती निर्माण होईल. तरुणांनी पैशाच्या मागे न लागता मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञान मिळाले तर आपोआपच पैसे मिळत राहतील’’, असे सांगितले.
दिलीपसिंह भोसले यांनी, ‘‘सहकारामध्ये प्रामाणिकपणे व सचोटीने काम केल्यास संस्थेबरोबरच समाजाचे हित साधता येते. त्यातूनच आज आपण जवळजवळ 15 सहकारी संस्थांचा कारभार यशस्वीपणे पाहत आहोत. कुठलाही उद्योग उभा करताना ध्येयवेडे होवून प्रयत्न करा; तुम्हाला नक्की यश मिळते’’, असे स्पष्ट केले.
‘‘आपल्या व्यवसायाचे सखोल ज्ञान मिळवून वेळेचा नियोजनपूर्वक वापर करून, आत्मविश्‍वासाने सतत कार्यरत राहिल्यास यश मिळू शकते’’, असे मत के. बी. उद्योग समूहाचे शिल्पकार सचिन यादव यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात प्रसन्न रुद्रभटे यांनी थिंक महाराष्ट्र डॉट कॉमच्या कार्याची माहिती देताना, ‘‘45 हजार खेड्यांची माहिती गोळा करण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगून, महाराष्ट्रातील प्रज्ञा, प्रतिभा आणि चांगुलपणाचे नेटवर्क निर्माण करून थिंक महाराष्ट्र लिंक महाराष्ट्र अशी संकल्पना असल्याचे सांगत फलटण तालुका संस्कृती महोत्सवाच्या नियोजनाची माहिती सांगितली’’. आभार जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी मानले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, फलटण उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम चे दिनकर गांगल यांच्यासह फलटणमधील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!