बारामती ( फलटण टुडे ): –
यशस्वी होण्यासाठी ध्यान योगसाधना महत्त्वाची ठरते, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विशेष कार्याधिकारी हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील योग महाविद्यालयातर्फे ध्यान योगसाधनेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पाटील बोलत होते.
प्रथम पुष्पामध्ये डॉ. नीलेश महाजन यांनी मध्यान योगफ या विषयावर ध्यानाच्या प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले व मेंदूला चालना देणारी काही क्रिया करून घेतल्या.
द्वितीय पुष्पामध्ये हनुमंत पाटील म्हणाले की, ऋषिमुनींनी त्यांच्या अपार ध्यानशक्तीच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहचविले आहे. मन हे चंचल असते, त्यावर नियंत्रण मिळवणे आणि त्याला आपला मित्र करून घेणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. मनाच्या आरोग्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात दिवसातले पंधरा मिनिटे तरी घालविले पाहिजेत. स्वतःचा शोध घेतला पाहिजे, त्यासाठी ध्यान योगसाधना महत्त्वाची आहे.
स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांच्या जीवनाचे प्रेरणामूल्य मोजण्यासाठी कोणतेही मोजमाप नाही. आजच्या युवकांनी त्यांचे विचार आदर्श मानून जीवनाला, समाजाला दिशा द्यावी. आपली संस्कृती ही आदर्श आहे. स्वामीजींच्या विचारांनी भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली. त्यांचे धर्म, प्रार्थना आणि ज्ञान यांचे विवेचन त्यांनी जगासमोर योग्य प्रकारे मांडले. आजचे युवक हे उद्याचा देश घडविणार आहेत, त्यामुळे स्वामीजींनी युवकांना सांगितलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या विचारांचा अवलंब केला पाहिजे आणि त्यांना अपेक्षित युवक होऊन स्वतःला, समाजाला व देशाला दिशा द्यावी, असे मत डॉ. भक्ती महाजन यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन स्मिता कदम यांनी केले. नीतू साळुंखे यांनी आभार मानले.