सातारा दि. 11( फलटण टुडे ) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रति लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदुळ तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना प्रति कार्ड कुटुंबास १५ किलो गहू व २० किलो तांदुळ पूर्णतः मोफत देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजना लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत मिळणारे गहू व तांदुळ घेताना दि. 1 जानेवारी 2023 ते दि. 31 डिसेंबर 2023 या कालावधीत कोणतेही शुल्क दुकानदारांना द्यावयाचे नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
यासाठी जिल्ह्याला महिन्याला सुमारे ८ हजार ४९५ मे. टन अन्नधान्य (गहू व तांदुळ ) वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय कार्ड – २७३०८ (अंत्योदय लाभार्थी- १,१९,३६९) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी – १५,५३,६२५ ( कार्ड संख्या ३,७३,७११) इतक्या लाभार्थ्यांना दिनांक १ जानेवारी २०२३ पासून मोफत धान्य वितरण केले जाणार आहे. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरु केली आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांनी यासाठी कोणतेही धान्याचे शुल्क लाभार्थ्याकडून आकारु नये. लाभार्थीनी POS (बायोमेट्रीक प्रमाणीकरण) मशिनवर आपल्या कुटुंबातील किती व्यक्ती नोंदीत आहेत हे पहावे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ व अंत्योदय लाभार्थीना प्रति कुटुंबास 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ याप्रमाणे धान्य दुकानदार देत आहेत काय याची खातरजमा करावी. सदरचे अन्नधान्य (गहू व तांदुळ) विनाशुल्क असलेने दराचा हिशोब करणेची आवश्यकता राहिलेली नाही. मात्र मिळणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण मात्र तपासून खात्री करणे व आपल्या हक्कांचा लाभ नियमाप्रमाणे प्राप्त करुन घेणे आवश्यक असल्याचे श्रीमती स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले.
या बाबत कोणतीही तक्रार असल्यास संबधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे अंत्योदय लाभार्थींना प्रतिकुटुंब देणेत येणारी 1 किलो साखर 20/- रुपये प्रमाणे देण्याची बाब पूर्वीप्रमाणेच लागू राहील.