सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा दिनांक 6 जानेवारी रोजी होत आहे. शाकंभरी पौर्णिमा यात्रेत आठ दिवस भक्तांची प्रचंड गर्दी असते. कोरोना काळानंतर संपूर्ण निर्बंध उठल्याने यावर्षी तब्बल दहा लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात्रा काळात होणारी प्रचंड गर्दी पाहून मंदिर प्रशासनाच्यावतीने भक्तांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती, मंदिराचे प्रभारी कार्यकारी अधिकारी बसवराज जिगराळ यांनी दिली आहे.
बेळगाव जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा,गोवा, आणी कर्नाटकासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या दर्शनाला वर्षभर भाविकांची गर्दी असते. यामध्ये ही प्रामुख्याने प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी तसेच नवरात्रीला देवी दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनाला येत असतात. प्रत्येक वर्षी डिसेंबर,जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातील पौर्णिमाला भरणाऱ्या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी असते.यामध्येही प्रामुख्याने जानेवारी महिन्यात होणाऱ्या शाकंभरी पौर्णिमा यात्रेला भाविकांची सर्वाधिक गर्दी असते.त्यामुळे मंदिर प्रशासनाने प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीची दक्षता घेत विविध उपाययोजना हाती घ्यावे लागत असतात.
कोरोना काळात सव्वा वर्ष देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.त्यानंतर काही काळासाठी विविध निर्बंधांसह मंदिर खुले करण्यात आले. मात्र त्यानंतर काही दिवसातच कोरोनाचा पुन्हा प्रभाव वाढला आणि मंदिर दर्शनासाठी बंद करावे लागले. यामुळे असंख्य भक्तांना कोरोनाची धास्ती आणि प्रशासनाचे निर्बंध यामुळे देवी दर्शनापासून दूरच राहावे लागले. यावर्षी होत असलेल्या शाकंभरी पौर्णिमा यात्रेला निर्बंध नसल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार दिनांक 6 जानेवारी असला तरीही रविवारपासूनच विविध भागातील भाविकांचे जथ्थे तळ ठोकू लागले आहेत. अनेक भावी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभावी कुंडाजवळ गर्दी करत आहेत. अनेकांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्री निवास अगोदरच आरक्षित केले आहेत. यावर्षीच्या यात्रेला तब्बल दहा लाख भाविक देवी दर्शनासाठी डोंगरावर येथील याकडे लक्ष देऊन यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी,स्वच्छता,पथदीप, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
40 छोट्या तर पाच मोठ्या टाक्यांच्या आधारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगरावर विविध ठिकाणी पाण्याचे नळ बसविण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सौंदत्ती डोंगरावरील सर्व पथदीपांची दुरुस्ती करण्यात आली आहे.संपूर्ण डोंगरावर प्रकाश व्यवस्था, त्याचबरोबर मोठी गर्दी होणाऱ्या स्नानकुंड,डोंगरावर येण्यासाठी असलेले 3 नाके आणि समाजकंटक आणी चोरट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी विविध ठिकाणी 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
यात्राकाळात डोंगरावर वाहनांची होणारी प्रचंड गर्दी होते, याकडे लक्ष देऊन विविध निर्धारित ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनीही रेणुका देवी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गरजेची विशेष नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला तसेच सौंदत्ती पोलीस यांना विशेष सूचना केले आहेत यात्रेच्या काळात अन्य ठिकाणाहून बंदोबस्तासाठी पोलिसांची कुमक बोलवण्यात आली आहे.
दि. 6 जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत.मंदिर प्रशासनाच्यावतीने शाकंभरी पौर्णिमा यात्रेनिमित्त सर्व प्रकारच्या आवश्यकत्या व्यवस्था हाती घेण्यात आल्या आहेत.यात्रेला येणाऱ्या भाविकांनी भावभक्तीने देवी दर्शन घ्यावे. आपण रहात असलेला परिसर स्वच्छ राखावा. यात्रा भक्ती भावात आणि शांततेत पार पाडावी यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन मंदिराचे प्रभारी कार्यकारी अधिकारी जिगराळ यांनी केले आहे.