श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण आणि व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग, व्यसनाधीनता जागरूकता मोहीम, महाराष्ट्र अंतर्गत आयोजित व्यसनाधीनता समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे प्रा. मारुती शेळके यांनी व्यसनाधीनता हे भरकटलेल्या युवक पिढीचे आवाहन आहे असे विद्यार्थ्यांना उद्देशून प्रतिपादन केले. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक ऐक्य वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद मेहता, प्रा. मारुती शेळके, संचालक, शेळके मास्टर माईंड अकॅडमी, अहमदनगर व श्री. शिवाजी खैरे, व्यसनमुक्ती युवक संघटना, बारामती यांची लाभली.
सदरील कार्यक्रमामध्ये प्रा. मारुती शेळके यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचे महत्व व संताच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्र राज्य, पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास, कृषि संशोधनावरील आधारित कृषि शिक्षण घेणारी युवक पिढी, सद्य परिस्थितीत विद्यार्थ्यांची असणारी जबाबदारी, व्यसनाधीनताचे तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम, व्यसनाधीनताचे भारत देशापुढील आवाहन, दैनंदिन जीवनातील सक्षमपना, युवकांचे व्यसनाधीनतातून समुपदेशन, यशस्वी जीवनासाठी वाटचाल आणि ध्येयप्राप्तीसाठी युवकांचे प्रयत्न या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी सामाजिक माध्यमाची विद्यार्थी जीवनातील व्यसनाधीनता, व्यसनाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, गुरुकुल शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती, योगासनाचे युवा पिढीसाठी असणारे महत्व आणि सक्षम नागरिक बनण्याचे आवाहन या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यानंतर महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनता व व्यसनमुक्ती आधारित पथनाट्य सादर केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एस. बिचुकले, प्रा. एस. पी. तरटे व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस. आर. कश्यप यांनी परिश्रम घेतले.