दत्तात्रय वाघ यांचा सत्कार करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शेजारी गोविंद पशू संगोपन विभागाचे अधिकारी व दुग्ध उत्पादक शेतकरी. दुसऱ्या छाया चित्रात मुक्त संचार गोठ्यातील दुधाळ गाई समवेत दत्तात्रय वाघ
.
फलटण दि.११ (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
शेतीला जोड धंदा म्हणून सुरु करण्यात आलेला दुग्ध व्यवसाय आता मुख्य व्यवसाय म्हणून पुढे येत असताना या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाद्वारे झालेली प्रगती पाहता आता अधिक दूध देणाऱ्या गाई खरेदीसाठी पंजाब किंवा अन्य राज्यात जाण्याची गरज उरली नाही तर प. महाराष्ट्रात किंबहुना फलटण मध्येही गोवंश जातीच्या दर्जेदार गाई उपलब्ध असल्याचे गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाई पावणे दोन लाखाची
प्रगतीशील दूध उत्पादक शेतकरी दत्तात्रय विजय वाघ, सांगवी, ता. बारामती यांच्या फार्म मधील अनुवंशिक चांगले गुणधर्म असणारी एच. एफ. जातीची, दुसऱ्या वितास गाभ असणाऱ्या गाईने प्रथम विल्यानंतर ३० लिटरहुन अधिक दूध दिले ती तब्बल पावणे दोन लाख रुपयांना विकली गेल्याच्या पार्श्वभूमीवर येथील गोवंश जातीच्या सुधारणा कार्यक्रमाचा आढावा घेताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
*कामधेनु गोवंश सुधार योजनेचा फायदा*
दत्तात्रय विजय वाघ यांचा दुग्ध व्यवसायातील अनुभव प्रदिर्घ आहे. वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायास त्यांनी आधुनिकीकरण, यांत्रिकी करणाची जोड देत गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सच्या पशूसेवा विभागांतर्गत पशू पालकांसाठी राबविल्या जाणाऱ्या कामधेनु गोवंश सुधार योजनेंतर्गत कृत्रिम रेतन सुविधा योजना त्याच्या दूध संकलन केंद्रामार्फत यशस्वीपणे राबविताना आपल्या फार्म मध्ये ही गेली ३ वर्षे यशस्वीरित्या राबविल्याने त्यांना अनेक फायदे दिसून आले त्याचाच भाग म्हणून त्यांच्या फार्म मधील एच एफ जातीची गाय किंमती असल्याचे सर्वमान्य ठरल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
*एम्रिओ ट्रान्स्फर (कृत्रीम भ्रूण प्रत्यार्पण) तंत्रज्ञान उपयुक्त*
आपल्या गोठ्यातील चांगल्या दुधाळ गाईंना गोविंद मार्फत पुरविल्या जाणाऱ्या कृत्रिम रेतनासाठी चांगले रेकॉर्ड असणाऱ्या वळूच्या वीर्यमात्रा, तसेच काही गाई मध्ये त्यांनी एम्रिओ ट्रान्स्फर (कृत्रीम भ्रूण प्रत्यार्पण) तंत्रज्ञान सुद्धा यशस्वीपणे राबविले आहे. कालवडींना जन्मल्यानंतर चिक दूध पाजणे, त्यांच्या वाढीनुसार दुध मिल्क रीप्लेसर काल्फ स्टार्टर तसेच आहार व्यवस्थापन, वेळच्या वेळी जंतनाशक औषध, लसीकरण करणे आणि या संपूर्ण व्यवस्थेचे रेकार्ड उत्तम प्रकारे ठेवले जाते, अगदी त्यांच्या जन्मापासून वजनाच्या नोंदी व अन्य सर्व नोंदी ठेवल्या जात असल्याने गोविंदचे मार्गदर्शन आणि पशू पालक शेतकऱ्यांची मेहनत यातून येथेच अधिक दूध देणाऱ्या उत्तम गोवंशाची निर्मिती गोविंदच्या मार्गदर्शन व सहकार्याने शक्य झाल्याचे दत्तात्रय वाघ यांनी सिद्ध केल्याचे नमूद करीत आज त्यांच्या मंगलमय डेअरी फार्मची ओळख अद्ययावत फार्म अशी असून तेथे लहान मोठी एकूण ६५ जनावरे आहेत, सरासरी दैनंदिन ४५० लिटर दुग्धोत्पादन होत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून देत दत्तात्रय वाघ व कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
*कालवड संगोपन, मुक्तसंचार, मुरघास याचा व्यवस्थापनात समावेश फलदायी*
दत्तात्रय वाघ यांच्या फार्म मध्ये प्रथम वितास गाभ असणाऱ्या कालवडी मध्ये लिंग निश्चित वीर्यमात्राचा वापर करुन १५ कालवडींचे संगोपन सुरु असून
सुयोग्य व्यवस्थापन, कालवड संगोपन, मुक्तसंचार, मुरघास या सर्व बाबी व्यवस्थापनात राबविल्या जात असताना गोविंद मिल्क व्यवस्थापन यांचे तांत्रिक मार्गदर्शन त्याच्या फार्म वर मिळत असून याचा ते लाभ घेऊन दत्तात्रय वाघ यांनी केलेल्या प्रगतीची माहिती घेऊन गोविंदच्या दूग्ध व्यवसाय विकास कार्यक्रमांतर्गत योजनेचा लाभ सर्व दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा आणि दुग्ध व्यवसाय आता जोड नव्हे मुख्य व्यवसाय आणि फायदेशीर व्यवसाय असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून द्यावे असे आवाहन यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
गोठ्यातील चांगले अनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या गाईंना प्राधान्य द्या
कालवड संगोपन करताना योग्य व्यवस्थापन केले तर २२ ते २४ महिन्यात त्या दुधात येतात प्रती लिटर ३ ते ५ रुपये आपण कालवड संगोपनातून मिळवू शकतो याची ग्वाही देत जे तरुण दूग्ध व्यवसाय करत आहेत त्यांना इतर राज्यातून गाई आणून व्यवसाय करण्यापेक्षा आपल्या गोठ्यातील चांगले अनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या गाईंना गोविंद मार्फत पुरविल्या जाणाऱ्या लिंग निश्चित वीर्यमात्राचा वापर करुन आपल्या गोठ्यातच चांगल्या गाई तयार कराव्यात व आपल्या भागामध्ये चांगल्या दुधाळ गाई कशा तयार होतील यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन दत्तात्रय वाघ यांनी तरुण दुग्ध उत्पादकांना केले आहे.
गोविंदला धन्यवाद !
आपले सरासरी दुग्ध उत्पादन वाढले तर उत्पादन खर्च कमी होऊन अधिकचा नफा शक्य असल्याचे आत्मविश्वासाने सांगत दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून दुग्ध व्यवसाय वाढी बरोबर दूध उत्पादक शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोविंदने केलेल्या प्रयत्नांबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (वाहिनी साहेब) व गोविंद पशू सेवा विभागाचे आभार दत्तात्रय वाघ यांनी व्यक्त केले.