फलटण, दि.10 ( फलटण टुडे ):
महाराष्ट्राचे भाग्यविधाते व देशाचे थोर नेते, रसिक, साहित्यिक व विचारवंत स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दि.25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित 10 व्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा आयोजित व येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दोन दिवसीय साहित्य संमेलन फलटणच्या नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालयात संपन्न होणार आहे. दि.25 रोजी या संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तर दि.26 रोजी संमेलनाचा समारोप महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, प्रसिद्ध वक्ते मधुकर भावे व माजी राज्यमंत्री तथा भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ.डॉ.विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.
या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष किशोर बेडकिहाळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी (सातारा) या वैचारिक व साहित्यिक व्यासपीठाची स्थापना करुन 15 वर्षे राज्यातील विविध विभागात ‘विचारवेध संमेलने’ आयोजित केली होती. या माध्यमातून 100 चे वर राज्यातील प्रमुख साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, राजकीय व सामाजिक विश्लेषक यांच्या विचारमंथनाचा लाभ मार्गदर्शक स्वरुपात समाजाला त्यांनी करुन दिला. विविध सामाजिक व राजकीय घडामोडी, साहित्यिक व पत्रकारांची अभिव्यक्ती यावरील ते चिंतनशील भाष्यकार असून एक उत्तम वैचारिक व मुद्देसूद मांडणी करणारे वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. साहित्यिक व वैचारिक क्षेत्रातील मानदंड असलेल्या ‘समाजप्रबोधन पत्रिका’, ‘नवभारत’ या मासिकांचे संपादक मार्गदशक म्हणूनही ते काम पाहत आहेत. रयत शिक्षण संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद (सातारा शाखा), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या विविध सामाजिक व साहित्यिक उपक्रमातही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन असते. किशोर बेडकिहाळ यांच्या या कार्याचे महत्त्व लक्षात घेवून यंदाच्या 10 व्या स्व.यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.