शिव व्याख्याते ॲड. उदयकुमार मोरे यांना सन्मान पत्र देवून गौरविताना श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर शेजारी जावेदभाई तांबोळी, नितीन भैय्या भोसले, अरविंद मेहता, सौ. चंदा जाधव.
फलटण दि. ८ :
छ. शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाचे वाचन, त्यांचा इतिहास, आदर्श व विचारांचा जागर आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी तरुण पिढीने पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत कोल्हापूर येथील प्रख्यात शिवव्याख्याते ॲड. उदयकुमार मोरे यांनी छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास ओघवत्या भाषेत उपस्थितांसमोर ठेवला.
क्रेडाई फलटण शाखेच्यावतीने गेल्या ५ वर्षांपासून प्रतिवर्षी दिवाळी किल्ले स्पर्धेचे आयोजन करुन शाळा, महाविद्यालयातील तरुणांना किल्ल्यांची माहिती व्हावी, आणि या किल्ल्याच्या माध्यमातून छ. शिवरायांचा तेजस्वी इतिहास अभ्यासण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावर्षी या किल्ले स्पर्धेत सहभागी झालेल्या तरुणांसह फलटण करांना या किल्ल्यांची महती, माहिती आणि त्यांच्या पराक्रमाचा तेजस्वी इतिहास समजावून घेण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी किल्ले स्पर्धांच्या बक्षीस समारंभास शिव व्याख्याते ॲड. उदयकुमार मोरे यांना क्रेडाई फलटणने निमंत्रित केले होते.
शिव व्याख्याते ॲड. उदयकुमार मोरे यांनी छ. शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाची माहिती देताना त्यासाठी छत्रपतींनी अनेक ठिकाणी उभारलेल्या विविध किल्ले प्रकारांची माहिती देताना किल्ल्यांचे प्रकार, त्यांची उभारणी, त्यांची उपयुक्तता आणि स्वराज्य निर्मिती व स्वराज्य संरक्षणासाठी या किल्ल्यांचे योगदान याविषयी सविस्तर विवेचन करीत छ. शिवराय आणि छ. संभाजी महाराज यांच्या इतिहासाची, त्यामधील पराक्रमांची माहिती उपस्थितांना देत या इतिहासाचा जागर तरुणांना निश्चित प्रेरणा देईल याची ग्वाही दिली.
फलटण शहर व तालुक्यासाठी आयोजित या किल्ले स्पर्धेत
छोटा गट, मोठा गट आणि खुला गट यातून एकूण ३५ स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी २५ शहरातील आणि उर्वरित तालुक्यातील विविध गावातून आले होते. परीक्षकांनी सर्व स्पर्धकांच्या कलाकृतींची पाहणी केल्यानंतर, बक्षीसासाठी खालील प्रमाणे निवडी केल्या, खुल्या गटातील पारितोषिक कृष्णा हरिश्चंद्र शिंदे यांना, मोठ्या गटातील तीनही पुरस्कार विभागून देण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक पवन राहुल बर्गे व एकता गणेशोत्सव मंडळ यांना, द्वितीय क्रमांक ओंकार हेमंत टंकसाळे व अविनाश नामदेव सपकाळ यांना, तृतीय क्रमांक पर्वराज पीयुष दोशी व ओंकार संदेश बिचुकले यांना विभागून देण्यात आला.
छोट्या गटात तीन पुरस्कार विभागून देण्यात आले. प्रथम क्रमांक सोहम संतोष जाधव व प्रथमेश नीलकंठ्ठय्या स्वामी, द्वितीय क्रमांक संजली चंद्रशेखर जाधव आणि सहकारी व रिध्दीमान सचिन सूर्यवंशी बेडके, तृतीय क्रमांक रणवीर शिरीष शिर्के व क्षितीज महेंद्र जाधव आणि वरुणराज नितीन कर्पे यांना उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा खो – खो असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन भैय्या भोसले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, क्रेडाई फलटणचे अध्यक्ष जावेदभाई तांबोळी, प्रख्यात इंटिरियर डिझायनर सौ. चंदाताई जाधव यांच्या हस्ते रोख रक्कम व श्रीफळ, प्रशस्ती देवून गौरविण्यात आले.
शिव व्याख्याते ॲड. उदयकुमार मोरे यांचा सन्मान पत्र, शाल, श्रीफळ, भेट वस्तू देवून श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
शिव व्याख्याते ॲड. उदयकुमार मोरे यांच्या समवेत या कार्यक्रमास उपस्थित असलेले बारामती औद्योगिक वसाहतीचे उप अभियंता सुनिल गायकवाड, कोल्हापूर येथील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक व उद्योजक रवींद्र डोईजड, दै. लोकमत कोल्हापूर कार्यालयातील प़ॉडक्शन मॅनेजर बाजीराव ढवळे, वीज वितरण कंपनी पुणे कार्यालयातील सहाय्यक अभियंता सुनिल पाटील, पाटबंधारे खात्यातील निवृत्त उप अभियंता तानाजी धामणकर यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रारंभी क्रेडाई संस्थापक अध्यक्ष महेंद्र जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात क्रेडाई फलटण शाखेच्या कामकाजाचा आढावा घेत गेल्या ५ वर्षांपासून आयोजित किल्ले स्पर्धा उपक्रमाविषयी माहिती दिली. सौ. वदना राजेंद्र निंबाळकर यांनी
सुत्र संचालन केले. क्रेडाई सदस्य अनिल निंबाळकर यांनी सन्मान पत्राचे लिखाण केले. क्रेडाई अध्यक्ष जावेदभाई तांबोळी यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास स्पर्धक, त्यांचे पालक, शहरातील बांधकाम व्यावसाईक, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष राजीव नाईक निंबाळकर व त्यांचे सहकारी पदाधिकारी, शहरवासीय नागरिक, क्रेडाई पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.