सोहोळ्यातील विणेकरी ह.भ.प. मामा पवार यांचा प्रातिनिधीक सत्कार करताना श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर शेजारी सूर्यकांत भिसे, करण भांबुरे वगैरे.
फलटण ( फलटण टुडे) :
श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या दरम्यान कार्तिकी एकादशी आणि संत शिरोमणी नामदेव महाराज ७५२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून यावर्षी प्रथमच काढण्यात आलेल्या पालखी, रथ आणि सायकल यात्रेचे स्वागत येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात विविध क्षेत्रातील मान्यवर, किर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळे आणि स्त्री – पुरुष भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
नामदेव समाजोन्नती परिषद, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि भागवत धर्म प्रचारक संस्था यांच्या संयुक्त सहभागाने या पालखी, रथ आणि सायकल यात्रेचे आयोजन दि. ४ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या रथा मध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज व गुरु गोविंदसिंह यांचे ग्रंथ, भागवत धर्माची पताका आहे. या यात्रेत सुमारे ११० सायकल यात्री सहभागी झाले असून त्यामध्ये बहुसंख्य सायकल यात्री ५०/५५ वर्षांहून अधिक वयाचे आहेत. १५ वयस्कर महिला सायकल यात्रींचा त्यामध्ये समावेश आहे.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी मोगल साम्राज्याच्या अंमल असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तीर्थक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते तीर्थक्षेत्र घुमान (पंजाब) या सुमारे २३५० कि. मी. अंतराचा पायी प्रवास ६ राज्यातून करीत भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार तर केलाच त्याच बरोबर राष्ट्रभक्ती, संस्कृती, सदविचार या बाबीही लोकांना समजावून देत एक उत्तम सामाजिक काम केल्याचे यावेळी निदर्शनास आणून देत त्याच मार्गाने हा सोहोळा घुमान पर्यंत जाणार असल्याचे यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी सांगितले.
क्रांतिसिंह नाना पाटील चौकात प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संचालक श्रीमंत सत्यजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, ऋषिराज नाईक निंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके, भाजप अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, अमिरभाई शेख, मेहबुबभाई मेटकरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रमेश आढाव, पत्रकार किरण बोळे, प्रसन्न रुद्र्भटे, ऍड. रोहित अहिवळे, शताब्दीकडे वाटचाल सुरु असलेल्या नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय उंडाळे व त्यांचे सहकारी पदाधिकारी, शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्माताई टाळकुटे व त्यांच्या सहकारी महिला यांनी स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन अध्यक्ष विजय उंडाळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा टाळकुटे, उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, मोहन जामदार, सुभाष भांबुरे, राजेंद्र गाटे, मनीष जामदार, करण भांबुरे, सुनील पोरे, ज्ञानराज पोरे व समाज बांधवांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला
त्यानंतर टाळ मृदंगाच्या निनादात भजनी मंडळींच्या विविध भजनाच्या तालासुरात सोहोळा क्रांतिसिंह नाना पाटील चौक, छ. शिवाजी महाराज चौक, बारामती चौक या मार्गाने नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिरात पोहोचला तेथे महिला व पुरुषांनी झिम्मा फुगडी खेळत मोठ्या उत्साहात सोहोळयाचे स्वागत केले. समाजातील मान्यवरांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पादुका पालखीतून काढून वाजत गाजत मंदिरात नेऊन ठेवल्या नंतर तेथे फलटण तालुका वारकरी संघाचे सचिव ह.भ.पं.केशव महाराज जाधव,डी. एम.घनवट,काटकर व त्यांचे सहकारी तसेच तरडगाव येथील भजनी मंडळ यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सोहळ्याचे स्वागत केले. भजनी मंडळाची भजन सेवा आणि ह.भ.प. स्वामीराज भिसे यांची किर्तन सेवा झाली.
चौकट :
१) पुणे येथील निवृत्त प्रा. डॉ. निरुपमा भावे या ७५ व्या वर्षी मोठ्या उत्साहाने सायकल यात्रेत सहभागी झाल्या आहेत.
२) सोहोळयात सहभागी अर्चना बोगीलवार या नागपूर येथील ६० वर्षीय महिलेने यापूर्वी लेह लडाख सायकल वारी केली आहे.
३) सेवानिवृत्त वैमानिक मिलिंद देशपांडे हे पुण्यातील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सायकल यात्रेत सहभागी झाले आहेत.