फलटण (फलटण टुडे ) :
राजेंद्र महादेव बरकडे निर्मित व भिमराव पडळकर दिग्दर्शित, छोट्या कळीच्या भावविश्वाचे दर्शन घडवणारी ही एक आगळी वेेगळी कथा असलेला वाघर हा चित्रपट येत्या 14 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे, दिग्दर्शक भिमराव पडळकर, सिनेमॅटोग्राफर अमन खान व आदी उपस्थित होते.
ट्रेलरमध्ये आपण पाहू शकता की एक 12 वर्षांची ठकी नावाची छोटी मुलगी आपल्या लहान भावासोबत आनंदी आहे, पण अचानक तिच्या लग्नाची तयारी चालू होते आणि तिच्या आनंदाला जणू काही नजरचं लागते. तिला इच्छा नसतानाही लग्न करण्याची वेळ येते व अनेक प्रसंगांना तोंड देताना यामध्ये दिसून येत आहे. ट्रेलर पाहून हा चित्रपट वास्तविकतेचे दर्शन घडवणारे वाटत आहे, चित्रपटाची कथा इमोशनल असून कुठे वळण घेणार हे ट्रेलर मधून स्पष्ट होत नाही. मात्र, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून रसिकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्माते राजेंद्र बरकडे यांनी व्यक्त केला आहे.
चित्रपटात समिक्षा सोनवलकर मिलिंद शिंदे संजय जाधव प्रिया दुबे यांच्यासह सहकलाकारांनी भूमिका निभावल्या असून ‘राजेंद्र फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत वाघर चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्ले व दिग्दर्शन भिमराव पडळकर यांचे असून अनेक मराठी व हिंदी चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर अमन खान यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. संगीताची बाजू रवि वव्हाळे आणि विकी हांडा यांनी पाहिली. चित्रपटाचा टिझर पाहून रसिक प्रेक्षकांना 14 ऑक्टोबर ची उत्सुकता लागून राहिली आहे, यात शंकाच नाही.