सातारा दि. 19 (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
राष्ट्रीय कृषि विकास योजना (प्रति थेंब अधिक पिक) सुक्ष्म सिंचन योजनेच्या लाभासाठी सर्व साधारण प्रवर्गातील, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करुन अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. संगणकीय सोडतीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, 8 अ उतारा, सामाईक क्षेत्र असल्याचा इतर खातेदारांचे सहमती पत्र साध्या कागदावर, शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सुक्ष्म सिंचन संच योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्यांने अर्ज मंजुर झाल्याच्या दिनांकापासून सात वर्षासाठी शेतमालकासोबत केलेल्या नोंदणीकृत कराराची प्रत, सातबारा उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद असावी नसल्यास विहिर, शेततळे इ. बाबत साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे महाडिबीटी पोर्टलवर अपलोड करावयाची आहेत.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी दि. 29 ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या आयोजित मेळाव्यात हजर राहून अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी मंडल कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.