सातारा दि.8 ( फलटण टुडे):
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरी व ग्रामीण भागात 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे उत्तमरित्या नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. गौडा बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, मनोज जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी झेंडे उपलब्ध झाले आहेत. त्याचे वितरण तालुक्यांना लवकरच करण्यात येईल. शासकीय कार्यालयांबरोबरच शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत फडकेल याबाबत नियोजन करा.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. याची नागरिकांमध्ये मोठी जनजागृती करा. शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करा. त्याचबरोबर प्रभात फेरी, वृक्षारोपण, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता सुशोभीकरण यासह अनेक विविध उपक्रम राबवा, असेही निर्देश श्री. गौडा यांनी दिले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती देशमुख म्हणाल्या, शासकीय इमारतींबरोबर सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे लोगो लावावेत. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांवर कार्यक्रमांचे नियोजन करावे. ज्या गावांमध्ये सैनिकांची संख्या जास्त आहे, अशा गावांमध्ये सैनिक कल्याण कार्यालयाच्या मदतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे सांगून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत प्रत्येक तालुक्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहितीही त्यांनी घेतली.
या बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.