मुंबई, दि. 16 ( फलटण टुडे वृत्तसेवा ) : परदेशातील मराठी भाषक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास / संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी मंचा’ची स्थापना करण्यात आली आहे. या कामासाठी समन्वयक / उपसमन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे आदेश राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनी काढले आहेत.
परदेशातील मराठी भाषक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास / संस्थेच्या परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याद्वारे संवाद वाढून परदेशात मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
भारत समन्वयक पदी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभिषेक सूर्यवंशी (अमेरिका), निवेदिता पानवलकर (अमेरिका), शोभा घुले (ऑस्ट्रेलिया), अमित वाईकर (थायलंड), निरंजन गाडगीळ (जपान), राहुल उरुणकर (केनिया), दीपक शिंदे (चीन), सचिन गांजापूरकर (सिंगापूर), मनोज कुलकर्णी (हाँगकाँग), शिल्पा गडमडे-मुळे (जर्मनी), गणेश गिते (आर्यलंड), अमोल सावरकर (स्विर्झलंड), प्रवीण कांबळे (युनायटेड किंगडम), मेघना वर्तक (दुबई), दयानंद देशपांडे (न्यूझिलंड), शैलेश असोंदेकर (सौदी अरेबिया), प्रशांत गिरबाने (भारत) यांची उपसमन्वयक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
परदेशात स्थायिक झालेले मराठी भाषक तेथे मराठी भाषेच्या संदर्भात विविध उपक्रम, कार्यक्रम करीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. जगातील अनेक देशांतील मराठी भाषकांसाठी उपक्रम राबविण्याची तरतूद राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेमध्ये आहे. या संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ९ मध्ये अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, कलम क्र. १३ मध्ये अन्य राज्यांत व परदेशात असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे आणि कलम क्र. १६ मध्ये स्वामित्वधन, देणग्या, शुल्क, विक्री मूल्य इत्यादी मार्गानी संस्थेचा राखीव निधी वाढविणे या उद्दिष्टांचा समावेश आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्थेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ९, १३ व १६ मध्ये नमूद केल्यानुसार, अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, अन्य राज्यांत व परदेशांत असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे, स्वामित्वधन, देणग्या, शुल्क, विक्री मूल्य इत्यादी मार्गानी संस्थेचा राखीव निधी वाढवणे या उद्दिष्टांना निश्चित दिशा देण्यासाठी, परदेशात मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धनासाठी कार्य करणाच्या व्यक्ती, संस्था यांच्या कार्याची शासनस्तरावर दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक / उपसमन्वयक यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या :
विविध देशातील अनिवासी मराठी भाषक, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, मंडळे यांचा परस्परांबरोबर संपर्क घडवणे, तसेच विविध देशात मराठी भाषेचा प्रचार प्रसार, जतन व संवर्धन यासाठी होणारे उपक्रम, कार्यक्रम याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला सादर करणे.
जगभरातील विविध मराठी मंडळांची सूची तयार करणे, उपलब्ध सूचीत आवश्यक ते बदल करून सूची अद्ययावत करणे व त्याबाबतची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला पाठविणे. संचालक, राज्य मराठी विकास संस्था व परदेशातील विविध महाराष्ट्र मंडळांचे प्रतिनिधी यांमधील
दुवा/समन्वयक या नात्याने त्यांच्या कार्याची माहिती परस्परांना पुरवणे. तसेच मराठी साहित्य, देवनागरी लिपी या संबंधातील कार्यक्रमांचे वृत्तांकन मिळवून त्यांचे दुवे राज्य मराठी विकास संस्थेपर्यंत पोहोचविणे. राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेत नमूद केलेल्या कलम क्र. ९ व १३ मध्ये नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संस्थेशी चर्चा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. तसेच, कलम क्र. १६ मध्ये नमूद केल्यानुसार, संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी परदेशातील सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे. परदेशात शिकणारे मराठी व अमराठी भारतीय तसेच परदेशी विद्यार्थी यांना राज्य मराठी विकास संस्थेबरोबर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे. जगभरातील समाजमाध्यमांमध्ये मराठी भाषेच्या वापरासंदर्भातील अहवाल प्राप्त करून व त्यांचा अभ्यास करून समाजमाध्यमांद्वारे मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासंदर्भात उपक्रमांचे नियोजन करणे. मराठी भाषा-साहित्य या संदर्भात जगभरातील विविध नियतकालिकांमधून संशोधनपर लेख लिहिण्यासाठी परदेशस्थ शिक्षणसंस्थांमधील मराठी तसेच अमराठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे. जगातील विविध देशात वास्तव्य करणाऱ्या तेथील मराठी भाषक, संस्था यांच्याकडून मराठी भाषेचा प्रचार प्रसार, संवर्धन व विकास यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, क्षणचित्रे, दृकश्राव्य चित्रफिती राज्य मराठी विकास संस्थेकडे पाठवणे.अशा जबाबदाऱ्या समन्वयक / उपसमन्वयक पदासाठी निश्चीत करण्यात आल्या आहेत