बारामती :
अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल ,संग्रामनगर ,कटफळ या शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शनिवार (ता. १६)ही निवडणूक पार पडली. यात मुलांचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रमण मोकाशी व मुलींची विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून प्रगती शिंदे विजयी झाले. उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून, प्रचारासाठी वेळ देण्यात आला व गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिक्षकांनी मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली. वर्गनिहाय मतदार याद्या केल्या, त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली व मतदान करण्याअगोदर विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. शाळेच्या वतीने विजयी उमेदवारांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री.संग्रामसिंह मोकाशी व संस्थेच्या सचिव सौ.संगीताताई मोकाशी यांनी केला. शाळेचे मुख्याध्यापक प्रा.प्रशांत वणवे सर यांनी निवडणुकी चे आयोजन केले. व शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. प्रकाश गोफणे सर तसेच इतर सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.