सातारा, दि. 12: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधून पशुसंवर्धन विभागामार्फत मोहिम स्वरुपात जंत निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 450 टिम तयार करुन 25 मे 2022 रोजी 900 गावात जंत निर्मूलनाचा कार्यक्रम शिबीर स्वरुपात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली आहे.
उर्वरित गावांधमील जनावरांचे जंत निर्मूलन दि.30 मे 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. जंत निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या जनावरांना तसेच सर्व शेळ्या- मेंढ्यांना जंत नाशक औषधाचे वाटप 1 रुपये नोंदणीशुल्क स्वरुपात घऊन सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी गावातील शिबीराच्या दिवशी शिबीराच्या ठिकाणी जाऊन जनावरांना जंत निर्मूलनाचे औषध घेऊन जावे व पशुधनाचे जंत निर्मूलन करुन घ्यावे. जनावरांना जंताचे औषध दिल्यामुळे जनावरांची वाढ चांगल्या प्रकारे होते. दूध उत्पादनात वाढ होते व पशुंची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तरी या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.