हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून बालेवाडी पुणे येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सब ज्युनियर हॉकी मुले व मुली संघाच्या निवड चाचणीमध्ये दि हॉकी सातारा संघटनेच्या कु. दिक्षा शिंदे, कु. निकिता देशमुख, कु. किरण मिंड या ३ महिला खेळाड व पियुष गायकवाड, प्रतीक चोरमले या पुरुष खेळाडूंची निवड झाली आहे.
सदर सब ज्यूनियर महिला हॉकी स्पर्धा मणिपूर इंफाळ आणि पुरुष हॉकी स्पर्धा गोवा येथे आयोजित करण्यात येत आहेत, त्या स्पर्धांमध्ये वरील सर्व खेळाडू सहभागी होणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये निकीता देशमुख ही के. एस. डी. शानभाग विद्यालय, सातारा ची खेळाडू असून उर्वरित ४ खेळाडू मुधोजी हायस्कूल, फलटणचे आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत सुरु असणाऱ्या जिल्हा हॉकी प्रशिक्षण केंद्रामध्ये हे सर्व खेळाडू जिल्ह्याचे मुख्य हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ व सागर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटणचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, सदस्य महेंद्र जाधव, प्रविण गाडे, सुजित निंबाळकर, सचिन लाळगे यांनी अभिनंदन केले आहे.