स्टँडअप इंडिया व मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न
सातारा दि. 18 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि. 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीत साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योनजेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा यशवंतराव चव्हाण इन्स्टिस्ट्युट ऑफ सायन्स, सातारा येथे 11 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करुन करण्यात आली. यावेळी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपआयुक्त स्वाती इथापे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. देशपांडे, प्रसन्न भिसे, डीकीचे जिल्हा समन्वयक अदित्य जेधे उपस्थित होते.
नवीन उद्योजकांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्जिन मनी योजनेचा लाभ प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त उद्योजकांनी घ्यावा अशी अपेक्षा समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रास्ताविकेत व्यक्त केली. तसेच या योजनेबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही केले.
जिल्हा जाती पडताळणी समितीच्या उपआयुक्त स्वाती इथापे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना विस्तृतपणे सांगून या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे. या करिता ज्या लाभार्थ्यांना लाभ झालेला आहे अशा लाभार्थ्यांनी योजनेची प्रचार व प्रसिध्दी करुन खऱ्या गरजू लोकांपर्यंत योजना पोहचविल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
डिकीचे जिल्हा समन्वयक व स्वत: लाभार्थी प्रसन्न भिसे यांनी स्टार्टअप इंडिया व मार्जिन मनी बाबत मार्गदर्शन केले. नवीन प्रकल्पासाठी या योजनेतून नव उद्योजकांना लाभ घेता येईल. आपला व्यवसाय सुरु करुन यशस्वी उद्योजक होता येईल. याबाबतचे उदाहरण दिले. स्टार्टअप इंडिया व मार्जिन मनीबाबत एक मॉडेल तयार करुन लवकरच तालुकानिहाय कार्यशळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतून मार्जिन मनीचा लाभ दिलेल्या एकूण 12 लाभार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.