महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील यांनी पटकविले*

 

 सातारा दि. 9 (फलटण टुडे ) :
 श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद कोल्हापूरच्या पै. पृथ्वीराज पाटील यांनी पटकविले. महाराष्ट्र केसरी कुस्तीची  मानाची चांदीची गदा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई व नामांकित मल्ल यांच्या हस्ते  पै. पृथ्वीराज पाटील यांना देवून गौरविण्यात आले.

 


 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व  जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 च्या अंमित सामन्याचे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात करण्यात आले होते.  यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, बाळासाहेब लांडगे, साहेबराव पवार, दिपक पवार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह आजी माजी कुस्तीपट्टू उपस्थित होते.  

 

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुस्ती या खेळाला महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. कुस्ती या खेळात महाराष्ट्रातील मल्लांनी ऑलिंपिक पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव जगात व्हावे यासाठी राज्यातील मल्लांना शासनामार्फत सहकार्य केले जाईल.  महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना उत्साहात होत आहे. महाराष्ट्रात अनेक ताकतीचे मल्ल घडले आहेत.  निवृत्त झालेल्या मल्लांनी नवीन मल्ल घडविण्यासाठी पुढे यावे. तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मल्ल होणे हे सोपे नाही यासाठी मेहनत, आहाराबरोबरच कुस्तीतील डावपेच शिकावे लागतात. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात होत आहे याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेंचा अंतिम सामना पाहण्यासाठी  कुस्ती प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!