फलटण : प्रसारमाध्यमे व साहित्यिक हे समाजातील महत्त्वाचे घटक असून त्यांची भूमिका ही सकारात्मक असावी. जे समोर दिसते त्याचे योग्य पद्धतीने विवेचन केले तर समाजमनाचा आरसा सर्वांसमोर येतो. त्यामुळे साहित्यिक व प्रसारमाध्यमे यांनी समाजभान राखणे काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
मार्गदर्शन करताना किशोर बेडकिहाळ. सोबत हरिष पाटणे, देवेंद्र भुजबळ, डॉ.वैभव ढमाळ, प्राचार्य शांताराम आवटे. (छाया : योगायोग फोटो, फलटण)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व फलटण शाखा यांच्यावतीने श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने फलटण येथे पार पडलेल्या 27 व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनातील ‘महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे व साहित्यिक सद्यस्थितीत समाजप्रबोधनात कमी पडत आहेत कां?’ परिसंवादात अध्यक्षस्थानावरुन किशोर बेडकिहाळ बोलत होते. व्यासपीठावर सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयातील डॉ.वैभव ढमाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे आदींची उपस्थिती होती.
किशोर बेडकिहाळ पुढे म्हणाले, अलिकडच्या काळातील प्रसारमाध्यमे ही व्यावसायिक बनू पाहत आहेत. त्यामुळे खरे चित्रण पुढे येताना अडचणी निर्माण झालेल्या दिसतात. त्यासाठी व्यावसायिकेतबरोबर मानवी मूल्यांची जपणूक होणेही गरजेचे आहे. मानवी मूल्ये जपायची असतील तर पत्रकार व साहित्यिक यांनी नि:पक्षपातीपणे लेखन करुन योग्य त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे.
हरिष पाटणे म्हणाले, प्रसारमाध्यमांनी एकांगी न जाता चोहोबाजूंचा विचार करुन व समाजाचे अवलोकन करुन बातमीची मांडणी केली पाहिजे. प्रसारमाध्यमे व साहित्यिक समाज प्रबोधनात कमी पडत नसून काळानुरुप बदलत्या परिस्थितीशी ते सामना करीत आहेत. यातून चांगल्या विचारांचे मंथन होणे गरजेचे आहे. प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे वारंवार त्याच बातम्या दाखवल्याने लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे बोलले जाते परंतु ती बातमी बिंबवून समाजामध्ये जागृकता निर्माण करण्याचे काम त्याठिकाणी केले जात असते असे सांगून साहित्यिकांनी व्यावसायिक न होता सकस व समाजाला दिशा देणारे साहित्य निर्माण केले तर निश्चितच समाज प्रबोधन घडून येईल, असेही पाटणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
देवेंद्र भुजबळ म्हणाले, प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा आहेत. त्यामुळे बातमी दाखवताना किंवा छापताना त्याचा सांगोपांग विचार झाला पाहिजे. त्या बातमीतून समाजाची मने दुभंगणार नाहीत याचाही विचार झाला पाहिजे. साहित्यिकांनी लिखाण करताना आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून लिखाण केले तर आपण समाजप्रबोधनात कमी पडणार नाही. देशाची राष्ट्रीय एकात्मता राखायची असेल तर साहित्यिक व पत्रकारांनी योग्य पद्धतीने लिखाण करुन समाजास दिशा द्यावी.
डॉ.वैभव ढमाळ म्हणाले, अलिकडच्या काळातील साहित्य संमेलनांमध्ये असे वास्तववादी विषय परिसंवादामध्ये घेतले जात नाहीत. सत्याला सत्य म्हणण्याची माणसांची मानसिकता बदलत चालली की काय अशी अवस्था आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका ठाम ठेवून समाज प्रबोधनात आघाडीवर असले पाहिजे. पत्रकार हा दैनंदिन साहित्यिक असतो. साहित्यिकांनी समाजामध्ये घडणार्या घटना यांचे डोळसपणे व संवेदनशील वृत्तीने लिखाण केले पाहिजे. पूर्वीचे साहित्यिक आणि अलिकडच्या काळातील साहित्यिक यांच्यामध्ये दरी दिसून येते. यासाठी वाचन संस्कृती वाढणे काळाची गरज आहे. साहित्यिक व प्रसारमाध्यमे हे दोन्हीही घटक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका समाजप्रबोधनात महत्त्वाची आहे.
यावेळी परिसंवादाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले. सूत्रसंचालन मसाप फलटण शाखा कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी मानले. यावेळी संमेलनाध्यक्ष सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, संमेलन कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी बेडके आदींसह साहित्यिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.