वाठार निंबाळकर दि. १६ :
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य यांची नुकतेच कार्यकारी मंडळ घोषित करण्यात आले. यामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सिंहाचा वाटा असणारे श्री.गणेश तांबे यांची वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्याच्या “कार्याध्यक्षपदी” निवड करण्यात आली आहे. गणेश तांबे यांनी आत्तापर्यंत विविध ग्रंथालय, शाळा, तसेच वाढदिवसानिमित्त जवळपास 400 पेक्षा जास्त पुस्तक वाटप केलेली आहेत. तसेच त्यांनी आठ महिन्यांमध्ये 100 पुस्तकांचे वाचन केले व त्या पुस्तकांचे समीक्षण करून सर्व वाचकापर्यंत पोहोचवले असल्याने त्यांना “राज्यस्तरीय वाचनयात्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.तसेच त्यांनी “पाझर मातृत्वाचा” हे आई विषयी असणारे पुस्तक संपादित केलेले असून त्याचा प्रकाशन सोहळा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मा.अध्यक्ष जि.प. सातारा यांच्या हस्ते पार पाडण्यात आला होता. तसेच रेशमीबंध नावाचा काव्यसंग्रह त्यांनी संपादित झाला आहे. वाचन केल्याने चांगले विचार व चांगले संस्कार घडत असतात त्यामुळे श्री.गणेश तांबे यांनी कमी कालावधीमध्ये वाचन संस्कृती व वाचन चळवळ वाढवण्यासाठी खूप मोठी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्याच्या संयोजिका श्रीमती प्रतिभा लोखंडे (नागपूर)यांनी त्यांची कार्याध्यक्षपदी निवड केलेली आहे. वाचनसाखळी समूह हा जवळपास 8000 वाचक सदस्यांचा समूह असून या वाचन साखळी समूहाद्वारे वेगवेगळे वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी व जोपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.