बारामती :
येथील रागिनी फाऊंडेशनच्या वतीने युवतींसाठी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ” आत्मनिर्भर मी ” या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी स्मिता शहा यांनी मार्गदर्शन करताना ‘ मुलींनी स्वबळावर जिद्दीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे, आत्मविश्वास आणि दृढनिश्चय यांची सांगड घालून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे, तरच महिला आत्मनिर्भर होऊ शकतात. असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद सह्याद्री करीअर अकॅडमीच्या संचालिका सुप्रिया रुपनवर यांनी भूषवले.
पोलिस भरतीपूर्व सराव करत असताना विद्यार्थिनींमध्ये जास्तीत जास्त अभ्यासाची गोडी लागून, अभ्यासाबरोबरच इतरही कौशल्यांची जडणघडण व्हावी, याकरिता आयोजन केले असल्याचे रागीनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले. या वेळी विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती बोधे, सुजाता लोंढे यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम सह्याद्री करिअर अकॅडमी सूर्यनगरी येथे उत्साहात संपन्न झाला.