फलटण :– फलटण तालुक्यातील आसू – ढवळेवाडी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाल्याच्या प्रश्वभूमीवर आसू येथील संवेदनशील व जागृत नागरीक हणमंत सुर्यवंशी यांनी शासन यंत्रणेची वाट न बघता स्वतःच रस्त्यावर उतरून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी धावून आल्याने संबधीत नागरिकाचे ढवळेवाडी -आसू भागात कौतुक होत आहे.
पावसामुळे शहर व तालुक्याच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, पुलाचे झालेले निकृष्ट दर्जाचे काम, खचून गेलेला पुल हे वाहन चालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे ढवळेवाडी (आसू ) लगत असलेला पुलावरील रस्ता खचल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनांचे अपघात रोजचे झाले आहेत. वाहन चालविताना वाहन चालकांना या रस्त्यावर मोठी कसरत करावी लागत आहे. यातून वाहनचालकांची सुटका व्हावी व अपघात होऊ नयेत या हेतूने आसू ते ढवळेवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे ढवळेवाडी येथील रहिवासी असलेल्या हणमंत महादेव सूर्यवंशी यांनी स्वतः: पुढाकार घेवून खड्डे बुजविणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याच रस्त्याचे सध्या काम सुरू आहे, मात्र पुढे खड्डे पडलेल्या रस्त्यावरील खड्याकडे मात्र दुर्लक्ष केलेले आहे.
आसू ते ढवळेवाडी एक ते दीड किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे दोन ते अडीच फुटाचा खड्डा पडला आहे. याच खड्ड्यात दोन ते तीन महिन्या पासून अनेक गाड्या घसरून अपघात झाल्याची घटना सुध्दा घडल्या आहेत. त्यामुळे कोणताही मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ नये. या उद्देशाने त्यांना कामावरून घरी जातांना रस्त्यावर मोठा खड्डा दिसला. त्यानंतर त्यांनी तो खड्डा बुजवायला सुरूवात केली. बाजूला पडलेले दगड, माती त्या खड्ड्यात टाकुन खड्डे बुजवले आहेत. हणमंत सूर्यवंशी यांनी कुणाकडे दाद न मागता तक्रार न करता स्वतःहून रस्त्यावरचे खड्डे बुजवले असून त्यांच्या या सामाजिक कामामुळे ढवळेवाडी – आसू भागात त्यांचे कौतुक होत आहे.