मुंबई :
शनिवार रोजी (२४ जुलै) टोकियो ऑलिंपिक २०२० च्या तिरंदाजी या खेळातील मिश्र गटातील इलिमिनेटर फेरीतील लढती पार पडल्या. मिश्र गटात दिपीका कुमारी आणि प्रविण जाधव भारताचे प्रतिनिधित्व करत होते. तर चायनिज ताईपीचे तांग छिह-चिन आणि लिन चिया-इन त्यांचे प्रतिस्पर्धी होते. चुरशीच्या लढतीनंतर अखेर भारताची जोडी, दिपीका आणि प्रविण यांनी चायनिज ताईपीच्या प्रतिस्पर्धींवर ५-३ ने विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली आहे.
मिश्र गटातील पहिल्या सेटमध्ये चाइनिज ताईपीने भारतावर २-० अशी आघाडी घेतली होती. परंतु पुढे दिपीका आणि प्रविणने तिसऱ्या सेटपर्यंत ४० गुणांची कमाई करत खेळ ३-३ ने बरोबरीवर आणला होता. अखेर शेवटच्या सेटला दोघांनी मिळून ३७ गुणांची नोंद केली. तर प्रतिस्पर्धी चायनिज ताईपीची तिरंदाजी जोडी ३६ गुण जोडू शकली. परिणामी भारताने चायनिज ताईपीवर ५-३ अशी आघाडी घेत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.