स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदाची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया 25,271 जागांसाठी असून यासाठीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर 17 जुलै पासून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सुरू आहे. या परीक्षेसाठीचे परीक्षा शुल्क 100 रुपये इतके असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक व महिला यांना परीक्षा शुल्क माफ आहे. या परीक्षेमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) 7545, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफ 8,464, सशस्त्र सीमा बल म्हणजेच एसएसबी 3806, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपी 1,431, आसाम रायफल्स 3,785, सेक्रेटेरियट सेक्युरिटी फोर्स म्हणजेच एसएसएफ 240 जागा अशा एकूण 25,271 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पुरुषांच्या 22,424 तर महिलांच्या 2,847 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 23 वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 18 ते 28 वर्षे याशिवाय इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 18 ते 26 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून उंचीची पात्रता पुरुषांसाठी 170 सेंटिमीटर तर महिलांसाठी 157 सेंटीमीटर इतकी आहे. अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना उंचीमध्ये सवलत देण्यात आली आहे. यामध्ये पुरुषांची उंची 162.5 सेंटीमीटर तर महिलांचे उंची 150 सेंटिमीटर इतकी आवश्यक आहे. पुरूषांच्या छातीचे मोजमाप घेतले जाते. यामध्ये छाती न फुगवता 80 सेमी. व 5 सेमी. छाती फुगवता येणे आवश्यक आहे. तसेच उंची आणि वयाच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन असणे आवश्यक आहे.
या पदांसाठीची लेखी परीक्षा 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून त्यासाठी 90 मि. इतका वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. ही लेखी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार असून यामध्ये सामान्य बद्धिमत्ता चाचणी व तर्कशक्ती, सामान्य ज्ञान, गणित व हिंदी किंवा इंग्रजी व्याकरण या 4 विषयांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. या शारिरीक क्षमता चाचणीत पुरुष उमेदवारांना 5 किमी. अंतर 24 मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक आहे. तर महिला उमेदवारांना 1.6 किमी. (1600 मी.) अंतर 8 मिनिट 30 सेकंदामध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.
या परीक्षेबाबत बोलताना सह्याद्री करिअर अकॅडमी, बारामतीचे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, या पदांसाठी सुरूवातीला ऑनलाईन लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक पात्रता चाचणी, वैद्यकीय चाचणी व कागदपत्र पडताळणी अशा क्रमाने ही परीक्षा प्रक्रिया पार पडली जाणार आहे.