राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातून एकदा महिला दक्षता समितीची बैठक बोलविण्यात यावी – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे




सातारा दि. 18 (जिमाका) : राज्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये महिला दक्षता समितीची महिन्यातून एकदा बैठक घेण्यात यावी.  महिला अत्याचारांवरील संरक्षण कायद्यांची समग्र माहिती पोलीस स्टेशनमधील प्रत्येक कर्मचाऱ्यास अवगत करावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केल्या.
येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या महिला दक्षता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.  बैठकीस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, विशेष  पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) राजवर्धन सिन्हा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह अकोला, रायगड, चंद्रपूर, अहमदनगर, बुलढाणा, बीड व सोलापुर(ग्रा) येथील पोलीस अधिक्षक उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे महिला अत्याचारांवरील पाठपुरावा न झालेल्या केसेसचा प्राधान्याने तपास करुन गुन्हे नोंद करावेत. स्थलांतरीत  होणाऱ्या कामगारांच्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत कार्यपध्दती निश्चित करावी. 18 वर्षा खालील अत्याचारीत केसेसबाबत प्राधान्य द्यावे. दर महिन्याला  दक्षता समितीची बैठक  घेऊन महिला दक्षता समितीमार्फत काय करायचं याबाबत पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करावे. प्रत्येक शासकीय कार्यालयातील होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींवर उपविभागीय पोलीस कार्यालयामार्फत कार्यवाही करावी. सोशल मिडीयावरुन स्त्रियांच्याबाबतीत नकारात्मक टिका-टिप्पणीवर त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यावेळी म्हणाले, सातारा जिल्ह्यात कोणत्याही अत्याचारीत महिलेने निनावी पत्राद्वारे तक्रार केल्यास त्यावर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडुन त्वरीत कार्यवाही करण्यात येते. स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत मंत्रालयस्तरावर राज्याचे पोलीस महासंचालक, राज्याचे अतिरीक्त मुख्य सचिव (गृह) व संबंधित सर्व पोलीस महानिरीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन नवीन कार्यपध्दती  आखण्यात येईल व ती लवकर कार्यान्वीत करुन अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करणे, अशा प्रकारचे गुन्हे घडणारच नाही अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतील असे आश्वासन दिले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!