सातारा दि.16 (जिमाका): जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी वैयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविल्या जातात. पशुपालकांना योजनांची व लाभार्थी निवडीचे निकष, अर्जाबाबत माहिती नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात अथवा पंचायत समितीकडील पशुसवंर्धन विभागामार्फत देण्यात येईल, इच्छूकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पारिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.
विशेष घटक योजनेतून अनु.जाती व नवबौध्द लाभार्थीकडील जनावरांना भाकड कालावधीसाठी 100टक्के अनुदानावर खाद्य वाटप. जिल्हा परिषद सेस योजनतूप सर्वसाधारण लाभार्थीना 50 टक्के अनुदानावर मिल्कींग मशीन वाटप करणे, कामधेनु आधार योजनतूप 50 टक्के अनुदानावर महिला लाभार्थीना 1 दुधाळ देशी, संकरीत गाय किंवा 1 म्हैस वाटप करणे, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी उपयोजनेतून अनु. जमातीच्या लाभार्थीना 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप (2 गाई, म्हैशी) अनु.जमातीच्या लाभार्थीना 75 टक्के अनुदानावर 10 शेळ्या व 1 बोकड वाटप अशा या योजनांचे स्वरुप आहे. या सर्व योजनांसाठी अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (वि), पंचायत समिती यांचेकडे तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. लाभार्थ्यांची निवड ही अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून निवड समिती सभेत पात्र लाभार्थीची योजनेच्या निकषांनुसार निवड करणेत येईल व उपलब्ध निधीच्या मर्यादेत लाभार्थीना लाभ देण्यात येणार आहे.इच्छूकांनी 15 जुलै 2021 पर्यंत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पंचायत समिती कडील पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करावेत.